पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असताना पुण्यात आणखी एक घटना घडली आहे. पुण्यात एका २३ वर्षीय विविहित महिलेने दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत आयुष्य संपवलं आहे. या प्रकरणी वाघोली पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , पुण्याच्या वाघोली परिसरात विवाहित महिलेने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. पुण्यात या महिलेने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन विवाहितेने आत्महत्या केली. हुंड्यासाठी सासरी होणाऱ्या छळाला वैतागून नवविवाहितेने आत्महत्या केली.
पोलिसांनी याप्रकरणी महिलेच्या पतीला अटक केली आहे. स्वाती सुरज पाठक (वय २३) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
२६ वर्षीय पती सुरज पाठक याला वाघोली पोलिसांनी अटक केली. ४५ वर्षीय सासू सुनिता पाठक, दीर निरज पाठक (वय २३), मामा अरुण उपाध्याय (वय ४५) आणि मामा अरविंद उपाध्याय यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
स्वाती आणि सूरज यांचा दीड वर्षापूर्वी विवाह झाला होता. लग्नात ५ लाख रुपये आणि सोन्याचे दागिन्याची मागणी करुन लग्नात १ लाख आणि ७ तोळे सोन्याचा हुंडा घेतला. लग्नानंतर मागणी प्रमाणे हुंडा दिला नसल्याने स्वातीला मारहाण करुन मानसिक त्रास द्यायला सुरुवात झाली होती. तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने पती आणि सासूने गहाण ठेवून पैसे घेतले.
सोने सोडवून आणण्यासाठी तिच्याकडे ३ ते ४ लाख रुपयांची मागणी केली. तेव्हा स्वातीच्या वडिलांनी ३ लाख रुपये दिले. त्यानंतरही स्वाती यांना घरगुती कारणावरुन वादविाद करुन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. सासरच्या मंडळीच्या छळाला कंटाळून ७ जून रोजी स्वातीने मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुसर्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली.