मुंबई– पुणे द्रुतगती मार्गावरून पुलाच्या दुरुस्ती व रंगकामाच्या कामासाठी 23 आणि 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत मेगाब्लॉक आहे .मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे.
पुलाच्या दुरुस्ती व रंगकामाच्या कामासाठी 23 आणि 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत प्रत्येकी तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत संबंधित दिशेची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ कडून देण्यात आली आहे.
MSRDC च्या माहितीनुसार, 23 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. त्यानंतर 24 एप्रिल रोजी त्याच वेळेत पुण्याकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. डोंगरगाव/कुसगाव (कि.मी. 58/500) येथील पुलावर दुरुस्ती व रंगकामाची कामे करण्यात येणार असल्याने हा मेगाब्लॉक आवश्यक ठरला आहे.
पर्यायी मार्गांची व्यवस्था
मेगाब्लॉकदरम्यान प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी प्रशासनाकडून पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. 23 एप्रिल रोजी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना किवळे, देहूरोड आणि तळेगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून कुसगाव टोल प्लाझामार्गे वळवण्यात येणार आहे. तर 24 एप्रिल रोजी पुण्याकडे येणाऱ्या वाहनांना कुसगाव टोल प्लाझामार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून देहूरोड आणि किवळे मार्गे पुण्याकडे वळवण्यात येईल.
प्रवाशांना सूचना
या मेगाब्लॉकमुळे दुपारच्या वेळेत वाहतुकीवर ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांनी आपला प्रवास वेळेआधी नियोजित करावा, तसेच शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवास करताना पाणी व आवश्यक सुविधा सोबत ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
प्रवासादरम्यान काही अडचण आल्यास मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग नियंत्रण कक्ष (9822498224) किंवा महामार्ग पोलीस (9833498334) यांच्याशी संपर्क साधता येईल. हा मेगाब्लॉक आवश्यक देखभाल आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतला जात असून, भविष्यातील प्रवास अधिक सुरक्षित व सुरळीत करण्यासाठी ही कामे महत्त्वाची असल्याचे MSRDC कडून स्पष्ट करण्यात आले आहे.