पुढील पाच दिवस धोक्याचे; वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता , 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
पुढील पाच दिवस धोक्याचे; वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता , 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
img
वैष्णवी सांगळे
महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेनंतर आता पुढील पाच दिवस मुंबई आणि महानगर प्रदेशासह संपूर्ण राज्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा इशारा भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिला आहे. कृषी विभागाने रविवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, ३० मार्चला प्रामुख्याने खान्देश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांत काही ठिकाणी मेघगर्जना, सोसाट्याचा वारा आणि गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भातही हवामानात बदल जाणवेल. ३१ मार्चला पावसाचा जोर काहीसा कमी होईल; मात्र, हवामान अस्थिर राहील. त्यानंतर १ ते ४ एप्रिल दरम्यान पावसाची तीव्रता पुन्हा वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे



पुणे, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर आणि मराठवाडा यांसारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये ताशी ५० ते ६० किमी वेगाने वाहणारे वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. दरम्यान, हवामानातील हा बदल लक्षात घेऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांना ३० मार्च ते ४ एप्रिल या काळात काढणीला आलेली पिके वादळ, गारपीट आणि वाऱ्यापासून वाचवण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

रब्बी पिकांची काढणी सध्या अंतिम टप्प्यात असल्याने शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन कृषी कामांचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. काढणी केलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावा. वादळी वारे आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group