जूनचा संपूर्ण महिना प्रतीक्षा करायला लावणाऱ्या पावसाने आता मात्र जुलै महिना सुरु होताच धुव्वाधार सुरुवात केली आहे. आजही हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 4 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत स्थानिक प्रवासात अडथळे आणि काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांनी या काळात सतर्क राहावे. विशेषतः सखल भागांमध्ये आणि घाट रस्त्यांवर प्रवास करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे.
त्याचबरोबर भारतीय हवामान विभागाने मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी पुढील 5 दिवसांचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, 04 आणि 05 जुलै रोजी पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात अत्यंत मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. हवामान खात्याने 7 जुलैपर्यंत पावसाचा हा जोर कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे.
नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी
बृहृन्मुंबई महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक - 1916
पालघर हेल्पलाईन क्रमांक - 02525 297474, +91 82379 78873
ठाणे महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक - 022-25364779, 0222530 1740, 91 93723 38827
ठाणे, आपत्ती व्यवस्थापन कक्ष - 1800-222-108/8657887101
पनवेल महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक - 02227458040/41/42