2024 मधील मान्सून हंगाम संपला असून यंदा सामान्यपेक्षा 7.6 टक्के जास्त पाऊस झाल्याचं भारतीय हवामान विभाग ने सांगितलं आहे. यावर्षी राजस्थान, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये सर्वाधिक अधिक पाऊस झाला. या कालावधीत, भारतात 934.8 मिमी पावसाची नोंद झाली, जी दीर्घकालीन सरासरीच्या 108 टक्के आहे. त्यामुळे यंदा 2020 नंतर सर्वाधिक पाऊस कोसळला.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य भारतात दीर्घकालीन सरासरीपेक्षा 19 टक्के जास्त पाऊस पडला. तसेच दक्षिण द्वीपकल्पात सामान्यपेक्षा 14 टक्के जास्त आणि वायव्य भारतात सामान्यपेक्षा सात टक्के जास्त पाऊस पडला. आकडेवारीनुसार, पूर्व आणि ईशान्य भारतात सामान्यपेक्षा 14 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. जूनमध्ये देशात 11 टक्के कमी पाऊस झाला. परंतु, जुलै महिन्यात पावसाची टक्केवारी वाढली.
तथापी, ऑगस्टमध्ये 15.7 टक्के पावसाची नोंद करण्यात आली. याशिवाय, सप्टेंबरमध्ये 10.6 टक्के अधिक पाऊस पडला. 2023 च्या मान्सून हंगामात भारतात 820 मिमी पावसाची नोंद झाली, जी दीर्घकालीन सरासरीच्या 94.4 टक्के होती.
दरम्यान, 2022 मध्ये देशात 925 मिमी पावसाची नोंद झाली, जी दीर्घकालीन सरासरीच्या 106 टक्के होती. 2021 मध्ये 870 मिमी, तर 2020 मध्ये 958 मिमी पाऊस झाला होता. भारतीय हवामान विभागाने यंदा सामान्यपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला होता. IMD चा हा अंदाज अखेर खरा ठरला आहे.