महाराष्ट्रात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यभरात मान्सूनने जोर पकडल्याने अनेक भागांत रस्ते जलमय झाले आहेत.
याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने कोकण, घाटमाथा आणि विदर्भात येलो अलर्ट तर पुणे, सातारा आणि रायगड घाट विभागात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.
राज्याच्या बहुतांश भागांत रविवारी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळाला.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ येथे विशेषतः मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जळगावमध्ये पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले असून, वाहतूक ठप्प होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
मुंबई, पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, सांगली, गोंदिया, सातारा या शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार उपस्थिती जाणवत आहे. काल अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट दिला होता.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. मात्र, घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहणार असल्याने तिथे ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे.
ऑरेंज अलर्ट : रायगड, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा
यलो अलर्ट : मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, बुलडाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.
विजांसह पावसाचा इशारा : वाशीम, नागपूर, वर्धा, यवतमाळ