ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. बुधवारी संध्याकाळी विजांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळं मुंबई ठप्प झाली तेव्हा आपातकालीन यंत्रणा कुठे होती? असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी टोळ्यांनी सगळी कंत्राटं वाटून घेतली आहेत असा आरोप केला. मेट्रोची गर्दी, रेल्वेची गर्दी, वाहतूक कोंडी, मुंबईचं इतकं भयानक चित्र कधीही पाहिलं नव्हतं.
आज मुंबई, ठाण्याकडे लक्ष देण्यासाठी कोणी नाही. आजुबाजूला जे गराडा घेऊन फिरतात तेच पोलीस बंदोबस्ताला लावले असते तर नागरिकांची गैरसोय झाली नसती. या सरकारचं प्राधान्य खोके आणि पैशांना आहे असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी ताशेरे ओढले आहेत.
काही मिनिटांच्या पावसात मुंबई ठाणे पुणे या शहरांत लोकांचे हाल झाले. मुंबई ठप्प झाली. पहिल्यांदाच वेस्टर्न हायवे तुंबले, बीएमसीची यंत्रणा काल कुठे होती. दोन पालकमंत्री काल कुठे होते. अर्धा किमीचे रस्तेही काँक्रीटचे झाले नाहीत .मुख्यमंत्री यांनी काल म्हटलं की कुठे भरलंय का पाणी यंदा आणि दोन तासांत मुंबई तुंबली असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावलाय.
बीएमसीत 15 वॉर्ड ऑफिसर नाहीयत. एवढी भयानक राजवट पाहिली नाही. काल रस्त्यावर अधिकारी दिसले नाहीत. पंप चालू नव्हते. पंपिंग स्टेशन अगोदरच सुरू केले नाहीत, 2005 नंतर वेस्टर्न हायवे तुंबला असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केलाय.
हेच त्यांचे राजकारण आहे. मुंबई लुटली, महाराष्ट्र लुटला, पक्ष फोडायचे त्यांचं काम. पण अर्धा तासांत शहरे बुडली, त्यावर नाही बोलणार असा टोला आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहांना लगावला