दैनिक भ्रमर : विवाह बाह्य संबंधामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. वैवाहिक जीवनात बाह्य संबंधामुळे भांडणे, घटस्फोट याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. पण आता हे विवाह बाह्य संबंध नवरा बायकोच्या जीवावर उठली आहेत. काही ठिकाणी पत्नी तर काही ठिकाणी पतीचा यामुळे बळी गेला आहे. मुंबईच्या गोरेगाव परिसरात देखील विवाह बाह्य संबंध असलेल्या बायकोमुळे पतीला स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. मुंबईत देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे.
मुंबईतील गोरेगाव येथील आरे कॉलनीत राहणाऱ्या राजश्री अहिरे हिचे चंद्रशेखर नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे तिचा पती भरत लक्ष्मण अहिरे याच्याशी तिचे बऱ्याच काळापासून वादही सुरु होते. १५ जुलैच्या रात्री चंद्रशेखरने भरतला एका ठिकाणी भेटण्यासाठी बोलावले. दोघांनीही चंद्रशेखरच्या भावाच्या मदतीने भरतला बेदम मारहाण केली. पतीला रुग्णालयात नेण्याऐवजी राजश्री त्याला घरी घेऊन गेली. तिने त्याला तीन दिवस उपचाराशिवाय ठेवले. ज्यामुळे भरतची प्रकृती खालावत गेली.
या घटनेनंतर निर्दयी राजश्री अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या भरतला धमकी देत राहिली की जर त्याने कोणाला सांगितले तर ती मुलांनाही मारून टाकेल. त्याला तीन दिवस घरात लपवून ठेवण्यात आले, जेव्हा त्याची प्रकृती बिघडली तेव्हा भरतला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच ऑपरेशन्सनंतरही तो वाचू शकला नाही आणि 5 ऑगस्ट रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
आरे पोलिसांनी खून आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल करून पत्नी राजश्री आणि आरोपी रंगाला अटक केली आहे, तर प्रियकर चंद्रशेखर अजूनही फरार आहे. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलेच्या दोन मुली आणि 3 वर्षांचा मुलगा महिलेच्या क्रूरतेचे साक्षीदार बनले. त्यांनी नातेवाईकांना वडिलांच्या प्रकृतीची माहिती दिली. नातेवाईक तिथे पोहोचले तेव्हा राजश्रीने सांगितले की भरत दुचाकी अपघातात जखमी झाला आहे, परंतु पोलिसांना राजश्रीच्या दाव्यावर शंका आली. पोलिसांनी मुलांशी याबाबत संवाद साधला तेव्हा सत्य बाहेर आले.