पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी एका लग्न समारंभात दोन अज्ञात हल्लेखोरांनी आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्याची आणि गावाच्या सरपंचाची गोळ्या घालून निर्घृण हत्या केली आहे. लग्नसमारंभाच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ५० वर्षीय जरमल सिंग हे तरनतारन जिल्ह्यातील वलतोहा गावचे सरपंच होते. ते शेजारच्या अमरकोट गावाचे सरपंच हरजीत सिंग सेरी यांच्या बहिणीच्या लग्नासाठी अमृतसरमधील वेर्का बायपासजवळील एका खाजगी रिसॉर्टमध्ये गेले होते. कार्यक्रम सुरु असताना लग्नत पाहुण्यांसारखा पेहराव करून आलेल्या काही हल्लेखोरांनी पिस्तूल रोखत त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जरमल सिंग यांचा जागीच मृत्यू झाला.
लग्नसमारंभात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या घटनेचा एक व्हिडिओ, शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर शेअर केला आहे, त्यात दोन पुरुष हूड आणि जीन्स घातलेले असून ते बंदुका घेऊन गर्दीतून चालत आहेत. व्हिडिओमध्ये, जरमल सिंग एका टेबलावर बसलेले दिसत आहेत. त्यांनी पिवळी पगडी घातली आहे आणि ते दुसऱ्या पाहुण्यांशी बोलत आहे. काही क्षणातच हल्लेखोर त्याच्याकडे आले, जवळून गोळीबार करत घटनास्थळावरून पळ काढला.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पाहुण्यांमध्ये गोंधळ उडाला.हल्ल्यानंतर सिंह यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांकडून आता अधिक तपास या घटनेचा सुरु आहे.