देशभरातील राजकारणाला हादरवणारी बातमी आहे. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अजित पवार बारामतीला पोहोचणार होते. त्यांचं विमान लॅण्ड होण्याआधीच काही अंतरावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. अजितदादांच्या अकाली निधनाने राज्यभरात आक्रोशाचं वातावरण आहे.
अजित पवारांच्या विमान अपघातानंतर काही तासांतच जयपूर विमानतळावर एका मोठ्या विमान अपघाताची टांगती तलवार होती. एअर इंडियाचे विमान लँडिंग करताना फेल झालं, ज्यामध्ये पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजस्थान काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर सिंह रंधावा यांच्यासह १३५ प्रवासी स्वार होते.
समोर आलेल्या माहितीनुसार एअर इंडियाचं विमान AI – 1719 दुपारी 1 वाजून 5 मिनिटांनी जयपूर एअरपोर्टवर पोहोचलं. त्यानंतर या विमानानं विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न केला. मात्र हे विमान जसं धावपट्टीवर उतरलं तसं त्याचं लँडिंग फेल झालं. धावपट्टीवरील खराब स्थिती किंवा काही तांत्रिक समस्येमुळे या विमानाचं पहिलं लँडिंग फेल झाल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान या विमानाचं पहिलं लँडिंग फेल होताच पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे. विमान जसं रन वेला टच झालं, त्यानंतर लगेचच पायलटने प्लेन ला गो अराउंड केलं. तब्बल 10 मिनटं हवेत घिरट्या घातल्यानंतर अखेर दुसऱ्या प्रयत्नामध्ये या विमानाचं धावपट्टीवर सुरक्षित लँडिग झालं आहे. या विमानातून प्रवास करणारे पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंह रंधवा हे पूर्णपणे सुरक्षित आहेत.