राज्याच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी कराडमधील माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केलं.त्यानंतर आज फलटण तालुक्यातील तरडगाव येथे भेट देऊन, राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्यासोबत झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले त्यांचे अंगरक्षक कै. विदीप जाधव यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेत दुःखात सहभागी होत धीर दिला.
शनिवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्या बारामतीला गेल्या होत्या. त्यानंतर आज त्यांचा पहिल्याच दौरा आहे. आज सुनेत्रा पवार या कराड आणि फलटणच्या दौऱ्यावर आहेत. कराड येथे त्यांनी प्रीतीसंगम बाग येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी विदीप जाधव यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज फलटण तालुक्यातील तरडगाव येथे भेट देऊन, राज्याचे दिवंगत लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या प्रतिमेस श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी विदीप जाधव यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेतली व त्यांच्या दुःखात सहभागी होत धीर दिला.
28 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. या विमान अपघातामध्ये अजित पवार यांचे पोलीस सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला.विदीप जाधव हे मूळचे फलटण तालुक्यातील लोणंदचे रहिवासी आहेत. 7 वर्षांपासून ते अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते.
याआधी आमदार रोहित पवार यांनीही विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. जाधव यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही त्यांनी घेतली आहे.मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले विदीप जाधव हे 2009 च्या बॅचचे कॉन्स्टेबल होते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होते. कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ते परिचित होते.