उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. त्यात विधिमंडळ गटनेतेपद जास्त काळ रिक्त ठेवणे योग्य नव्हते. त्यामुळे तातडीने पक्षातील नेत्यांनी हालचाली सुरू करत अजित पवारांच्या अकाली एक्झिटमुळे रिक्त झालेल्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली. राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्या आज सायंकाळी ५.३० वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत. राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.
अजितदादांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री कोण होणार? अशी चर्चा सुरु होती. आता उपमुख्यमंत्रीपदी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार शपथ घेणार आहेत.या बैठकीआधी देवगिरी बंगल्यावर पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर बोलताना सुनील तटकरे यांनी म्हटले की, राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत जनतेची भावना लक्षात घेता गटनेतेपदी सुनेत्रा पवार वहिनी यांची निवड होईल.