१५ जून २०२४
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची नाशिक लोकसभा लढवण्याची इच्छा होती. मात्र, महायुतीकडून ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली. त्यामुळे त्यांना लोकसभा लढवता आली नाही. त्यानंतर राज्यसभेची जाण्याची संधी असताना अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना संधी दिली. शिवाय, छगन भुजबळ सातत्याने महायुतीच्या विरोधात वक्तव्य करतानाही दिसले आहेत.
त्यामुळे छगन भुजबळ पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार का? असा सवाल उपस्थित होतं होता. आता छगन भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबतचे उत्तर दिले आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ?
छगन भुजबळ म्हणाले, मीडियाला वाटतं की, मी घरवापसी करणार आहे. हा मीडियाचा प्रचार आहे. मी नेहमी सत्याची बाजू घेत आलेलो आहे. जे खरं आहे ते मी बोलत असतो. एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसेल तर मी सांगतो की, मला या प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाही. मी शरद पवारांच्या पक्षात जाणार नाही. मी कोणतीही खिडकी उघडी ठेवलेली नाही. ना दरवाजा उघडा नाही. कोणीही माझ्यासाठी रेड कार्पेट टाकलेलं नाही.
दरम्यान भुजबळ पुढे बोलताना म्हणाले, वस्तूस्थिती काय आहे ? हे पाहून आपल्याला पुढील पाऊलं टाकायची आहेत. त्याच्यापूर्वी आपल्याला काहीतरी धडा घ्यायचा आहे. आपल्या ज्या काही त्रृटी असतील त्या दूर करुन महायुतीला पुढील निवडणुकीला सामोरे जायचे आहे. मी आहे त्या पक्षात आणि महायुती बरोबर राहणार आहे, असंही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
Copyright ©2024 Bhramar