नवी दिल्ली : जम्मूमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी गटातील एक किंवा दोन सदस्य स्वातंत्र्य दिनाच्या आसपास दिल्ली आणि पंजाबमध्ये आत्मघाती हल्ला करण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे भारतीय गुप्तचर यंत्रणा हाय अलर्टवर असून दिल्ली आणि पंजाबमध्ये हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे.
दहशतवाद्यांमधील संभाषणाचा हवाला देत गुप्तचर विभागानं सूचित केलं आहे. गुप्तचर यंत्रणांनी सांगितलंय की, सुरक्षा दलांच्या मोठ्या प्रमाणावर तैनातीमुळे हा हल्ला 15 ऑगस्टला झाला नसला, तरी एक-दोन दिवसांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
गुप्तचर माहितीचा हवाला देऊन एका सूत्रानं सांगितलं की, "जम्मू आणि काश्मीरमधील कठुआच्या सीमेवर असलेल्या एका गावात अलीकडेच शस्त्रांसह दोन अज्ञात व्यक्तींच्या हालचाली आढळून आल्या आहेत. ते जवळच्या पठाणकोट शहराकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही."
याबाबत एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार , 1 जून रोजी स्फोटकं/आयईडीची खेप जम्मू शहराच्या अंतरावर पोहोचली. या स्फोटकांचा वापर आगामी काळात सुरक्षा आस्थापना, कॅम्प, वाहनं किंवा महत्त्वाच्या आस्थापनांना लक्ष्य करण्यासाठी केला जाऊ शकतो.
पंजाब आणि जम्मू आणि काश्मीरच्या लगतच्या भागांत कार्यरत असलेल्या गुंड, कट्टरपंथी आणि दहशतवाद्यांचा आयएसआय प्रायोजित संबंध स्वातंत्र्यदिन आणि सध्या सुरू असलेली अमरनाथ यात्रा विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत होता. गुप्तचर विभागाच्या सतर्कतेनुसार, "15 ऑगस्टच्या आसपास मोठ्या संख्येनं लोकांना लक्ष्य करण्यासाठी तयार केलेल्या IEDs चा वापर केला जाऊ शकतो. यासोबतच सरकारच्या काही निर्णयांवर किंवा कृतींबाबत असंतुष्ट घटकांकडून सूडबुद्धीची कारवाई होण्याची शक्यता असल्यानं धोका आणखी वाढला आहे."
दिल्लीत हायअलर्ट
दिल्लीच्या पोलीस मुख्यालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली . बांगलादेशातील परिस्थिती बघता दिल्ली NCR मध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बैठकीत चर्चा झाली. यानंतर दिल्ली पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. बांगलादेशात सध्या गृहयुद्ध भडकलं आहे. अनेक बांगलादेशी नागरिक भारताच्या हद्दीत येण्याचा प्रयत्न करत आहेत.
या पार्श्वभूमीवर भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीत हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दिल्लीच्या पोलीस मुख्यालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशमधील परिस्थिती बघता दिल्ली एनसीआरमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बैठकीत चर्चा झाली. यानंतर दिल्ली पोलिसांना अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश देण्यात आले.