नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) : मुंबईत ११ जुलै २००६ हल्ल्याचा मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी मोठा निकाल दिला. मुंबईला हादरवून सोडणाऱ्या साखळी बॉम्बस्फोट हल्लयात १८९ लोकांचा मृत्यू झाला होता तर ८०० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील १२ आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयाने ५ जणांना फाशीची शिक्षा तर ७ जणांना जन्मठेप सुनावली होती.
मुंबईला हादरून टाकणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटातील दोन आरोपी नाशिकरोड कारागृहात असून न्यायालयाच्या प्रक्रियेनंतर त्यांना सोडण्यात येईल असे कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटराव यांनी सांगितले. २००६ साली मुंबई मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आठवणी आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत आहे. जखमी आजही ते शल्य विसरू शकत नाही.
सत्र न्यायालयाने यातील आरोपींना शिक्षा सुनावली होती. त्या नंतर यातील आरोपींना राज्यातील विविध कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यातील दोन आरोपींना नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात गेल्या १९वर्षा पासून ठेवण्यात आले होते. उच्च न्यायालयाने या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या दोन आरोपींबाबत न्यायालयीन प्रक्रियेनंतर निर्णय घेतला जाईल. साधारण दोन ते तीन दिवस जातील असे कारागृह अधिक्षक अरुणा मुगुटराव यांनी सांगितले.