विधानसभा निवडणुक : काँग्रेस नेत्यांमध्ये दिल्लीत बैठक ; काय चर्चा झाली? वाचा
विधानसभा निवडणुक : काँग्रेस नेत्यांमध्ये दिल्लीत बैठक ; काय चर्चा झाली? वाचा
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही सक्रिय झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून दिल्लीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीत जागावाटपासहित राजकीय समीकरणाची चर्चा झाली. तसेच राज्यातील काही जागांवरील तिढा सोडवावा, अशी मागणी राज्यातील नेत्यांनी वरिष्ठांकडे केली आहे.

काँग्रेस नेत्यांची राज्यातील जागावाटपाच्या तिढ्यावर दिल्लीत चर्चा झाली. काही जागांचा तिढा राज्यात सुटत नसल्याने केंद्रीय नेतृत्वाने लक्ष घालण्याविषयी चर्चा झालीय. राज्यातील नेत्यांनी १५ जागांचा तिढा केंद्रीय नेतृत्वाने दिल्लीत सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे.

राज्यातील नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षांकडे एकमुखाने मागणी केली. या मागणीनंतर केंद्रीय नेतृत्व हस्तक्षेप करून तिढा सोडवेल, तुम्ही निवडणुकीच्या बाकी कामाला लागा, अशा सूचना काँग्रेसच्या वरिष्ठांनी राज्यातील नेत्यांना दिल्या आहेत.

बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? 

दिल्लीतील काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांनी हरियाणातील पराभवाचा धसका घेतला आहे. 'महाराष्ट्राचा हरियाणा होऊ द्यायचा नाही, असं म्हणणं बैठकीत नेत्यांनी मांडलं. महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी वादाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने काँग्रेस नेतृत्व अलर्ट मोडवर आहे. तर मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजात समन्वय राहील याची काळजी घ्या, अशा सूचना नेत्यांना देण्यात आल्या आहेत. 'कुठल्याही परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडीच सरकार आणायचंच आहे, अशाही सूचना काँग्रेसच्या केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील नेत्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बैठकीत जाहीरनाम्यावर काय चर्चा झाली?

आज दिल्लीतील बैठकीत काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरही चर्चा झाली. या बैठकीत जाहिरनाम्यात काय असणार, याबाबत चर्चा झाली. कृषी समृद्धी शेतकरी सन्मान योजना, महालक्ष्मी योजना, स्री सन्मान योजना,कुटुंब रक्षण, युवकांसाठी योजना, समतेची हमी अशा विविध योजनेवर चर्चा झाली. कृषी समृद्धी शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं ३ लाखापर्यंत कर्ज माफ केलं जाणार आहे. तर ही कर्जमाफी साधारण २८ हजार कोटींची असणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group