महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची 'हयात' आणि 'मातोश्री'वर महत्वाची बैठक, काय ठरलं?
महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची 'हयात' आणि 'मातोश्री'वर महत्वाची बैठक, काय ठरलं?
img
Dipali Ghadwaje
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यावर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांनी विजयाचा दावा केला आहे. मात्र, असं असलं तरी निकाल समोर आल्यानंतरच कोणाला किती जागा मिळतात? हे स्पष्ट होणार आहे. उद्या शनिवारी निकाल लागळणार असून ९ नंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, राज्यात त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाल्यास पुढची रणनीती काय असणार या साठी आता मुंबईत खलबतं रचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत बुधवारी रात्री महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, अनिल देसाई, काँग्रसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, सतेज पाटील तसेच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईतील हॅाटेल ग्रँड हयात इथे तब्बल अडीच तास बैठक चालली. ही बैठक संपवून जयंत पाटील, संजय राऊत, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील एकाच गाडीत बसून मातोश्रीवर पोहचले. तिथे उद्धव ठाकरे यांच्यासोबत तब्बल पाऊन तास चर्चा करून पुन्हा मविआचे नेते जयंत पाटील, सतेज पाटील, बाळासाहेब थोरात हे एकत्रित बाहेर पडले.

या दोन्ही बैठकांमध्ये महाविकास आघाडीकडून बंडखोर अपक्ष उमेदवार यांना संपर्क सुरू करण्यात आल्याबद्दल चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांच्या माध्यमातून जे बंडखोर विजयी होऊ शकतात अशा भावी आमदारांना फोनवर संपर्क करण्यात आल्याची माहिती आहे.

कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वाटत नसल्याने राजकीय पक्ष आता सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या किमान 145 जागांसाठी जुळवाजुळव करत आहेत. या गुंतागुंतीच्या परिस्थितीत अपक्ष आमदार राज्याची पुढची सत्ताधारी आघाडी ठरवण्यात महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. हे लक्षात घेऊन अपक्ष आमदारांना गळाला लावण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून चर्चा करीत आहेत.

महाविकास आघाडीच्या वतीने निकालाआधीच बंडखोरांना संपर्क साधून त्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. निकालाचे कल समोर येत असताना आपापल्या आमदारांना एकत्रित कसे ठेवायचे याबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group