ज्यांनी शेण खाल्लं त्यांच्यावर कारवाई होईल,  संजय राऊत कडाडले, नेमकं प्रकरण काय ?
ज्यांनी शेण खाल्लं त्यांच्यावर कारवाई होईल, संजय राऊत कडाडले, नेमकं प्रकरण काय ?
img
वैष्णवी सांगळे
चंद्रपूर महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाने भाजपला पाठिंबा दिल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेत ठाकरे गटाने अचानक पाठिंबा दिल्यामुळे भाजपने सत्तास्थापन करत आपला महापौर बसवला. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला. भाजपच्या संगीता खांडेकर या चंद्रपूरच्या महापौर झाल्या आहेत. तर ठाकरे गटाचे प्रशांत दानव हे चंद्रपूर महानगरपालिकेचे उपमहापौर झाले आहेत. 

आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  यांनी पत्रकार परिषदेत चंद्रपूरमधील स्थानिक राजकीय घडामोडींवर स्पष्टीकरण दिले. चंद्रपूर येथे जे घडले, त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कोणतीही भूमिका नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. भारतीय जनता पक्षाने शिवसेना फोडली, पक्षचिन्ह चोरले आणि महाराष्ट्रात अराजक निर्माण केले, अशा परिस्थितीत त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी कधीच घेतली नाही आणि घेणार नाहीत, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

चंद्रपूरमध्ये ज्यांनी शेण खाल्लं त्यांच्यावर कारवाई होईल. चंद्रपूरमध्ये जे आमच्या पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घेतला ती आमची भूमिका नाही. त्यांचं आम्ही समर्थन करत नाही.  स्थानिक नेत्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी काही निर्णय घेतले असतील, तर त्यांच्यावर कारवाई होईल, तसेच परभणी महापालिकेमध्ये काँग्रेसने आम्हाला पाठिंबा दिल्याने आभार मानतो, असंही संजय राऊत म्हणाले.

संजय राऊतांचं संदीप देशपांडेंना प्रत्युत्तर
महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांना एक-एक कोटी देण्यात आलेत. शिवाय त्यांना वेगळ्या ऑफर दिल्याचा दावा, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला होता. यावर देखील संजय राऊतांनी संदीप देशपांडे यांचं नाव न घेता प्रत्युत्तर दिलं. ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी 1 कोटी रुपये घेतले, असा आरोप ज्यांनी केला ते भाजपसोबत पैसे मोजायला बसले होते का?, त्यांचं 20 टक्के कमिशन होतं का?, असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group