"आरोप झाले तरी जनता माझ्यासोबतच"; विजयानंतर नवनिर्वाचित सरपंच स्वरूपानंद देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
img
नितीशा कुलकर्णी






संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बीडमधील मस्साजोग सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. राजकीय हत्या आणि कौटुंबिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या अटीतटीच्या लढतीत स्वरूपानंद देशमुख यांनी बाजी मारली आहे. त्यांनी दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा ९२ मतांनी पराभव करत सरपंचपद आपल्याकडे खेचून आणले. 'सहानुभूती' पेक्षा मतदारांनी 'विकासाच्या' दाव्याला पसंती दिल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे.

संतोष देशमुख यांच्या निर्घृण राजकीय हत्येमुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अचानक प्रकाशझोतात आलेल्या बीड (Beed News) जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचा (Massajog Election Results 2026) निकाल बुधवारी जाहीर झाला. या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख (Swarupanand Deshmukh) यांनी विजय मिळवला. स्वरुपानंद देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख (Ashwini Deshmukh) यांचा 92 मतांनी पराभव करत या निवडणुकीत बाजी मारली. मस्साजोगच्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले होते.

या निवडणुकीसाठी 84 टक्के मतदान झाल्याने मस्साजोगची जनता कोणाच्या बाजूने कौल देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या कुटुंबीयांनी प्रयत्न केले होते. मात्र, स्वरुपानंद देशमुख शेवटपर्यंत निवडणूक लढवण्यावर ठाम होते. यावरुन संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी नाराजीही व्यक्त केली होती. या निवडणुकीत अश्विनी देशमुख यांना सहानुभूतीच्या फॅक्टरचा फायदा होईल, असा अंदाज होता. मात्र, हा अंदाज फोल ठरला आणि स्वरुपानंद देशमुख विजयी झाले. (Maharashtra Politics news) गेल्या 15 दिवसांपासून मस्साजोगामध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरु होता. स्वरुपानंद देशमुख  आणि अश्विनी देशमुख यांनी गावात दारोदार फिरुन मतदारांशी संवाद साधला होता.

आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा पहिल्या फेरीपासूनच स्वरुपानंद देशमुख यांनी मोठी आघाडी घेतली. पहिली, दुसरी आणि तिसरी अशा मतमोजणीच्या तिन्ही फेऱ्यांमध्ये स्वरुपानंद देशमुख आघाडीवर होते. सरतेशेवटी त्यांनी 92 मतांनी विजय प्राप्त केला. या निकालानंतर मस्साजोगचे नवनिर्वाचित सरपंच स्वरुपानंद देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो, माझे मतदार माझ्यासोबत आहेत. त्यांनी मतदानरुपी आशीर्वाद देऊन हे सिद्ध केले आहे.

कोणी माझ्यावर काहीही आरोप केले तरी माझी जनता माझ्यासोबत आहे. मी अगोदरही संतोष देशमुखांसाठीच्या न्यायासाठीच्या लढाईत पुढे होतो, इथून पुढेही या लढाईत मी असेन. हा विजय माझ्या तरुण मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा आहे. त्यांनी माझ्यासाठी रात्रीचा दिवस केला, हा माझ्या गावातील जनतेचा आणि स्वाभिमानी मतदारांचा विजय आहे. आगामी काळात गावातील आपली कामं कोण करु शकतो, हे जनतेने लक्षात घेतलं आणि मला मतदान केले, अशी प्रतिक्रिया स्वरुपानंद देशमुख यांनी व्यक्त केली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group