"निव्वळ आमदारकीसाठी मी कुणाकडे जाणार नाही, पण शेतकरी आणि दिव्यांगांचे प्रश्न सुटणार असतील तर विचार करायला हरकत नाही," अशा शब्दांत 'प्रहार'चे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आपल्या राजकीय प्रवासाचे संकेत दिले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेत प्रहारचे विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला असला, तरी एकनाथ शिंदेंचा 'पाईक' म्हणून विधान परिषदेवर जाण्याची तयारी दर्शवून कडू यांनी नव्या समीकरणाचे दार उघडे ठेवले आहे.
विधानपरिषदेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून ‘प्रहार’चे अध्यक्ष बच्चू कडू यांना ऑफर देण्यात आल्याची चर्चा होती. यासाठी शिवसेनेकडून कडू यांना प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करावा, अशी अट घालण्यात आल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. या सगळ्या चर्चांनंतर आज (बुधवारी) बच्चू कडू यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, शेतकरी (Farmer) शेतमजूरांसाठी काम करणाऱ्या माझ्या सारख्या माणसाचा विधानसभेत पराभव झाला. तरीही त्यांच्यासाठी काम करणे मी थांबवले नाही. या समूहाचे प्रश्न मांडण्यासाठी संधी मिळत असेल तर आनंद आहे. पदासाठी युतीसाठी युती करणारा मी नाही.
फक्त आमदारकीसाठी मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार नाही. शेतकरी-शेतमजूर-दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी काही मदत होत असेल तर मात्र विचार करेन असे म्हणत कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे विधान परिषदेवर जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. पुढे ते म्हणाले की, राज्यभरात प्रहार संघटनेचे (Prahar Sanghtana) एक लाख पेक्षा अधिक सदस्य आहेत. शिवसेनेच्या बंडखोरीतून प्रहार संघटना समोर आली. मी एकमेव माणूस आहे की, मी कुणाला पाठिंबा दिला नव्हता, ना कधी पाठिंबा घेतला. विलनिकरणाची चर्चा बघितली तेव्हा वाईट वाटलं.
बातमीतून बातमी तयार झाली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला तरी आम्ही थकलो नाही. माझा भाजपसोबत जाण्याचा निर्णय मतदारांना आवडला नाही, असेही बच्चू कडूंनी सांगितले. तसेच काँग्रेस राष्ट्रवादीसोबत अनेक वर्षे बसलो पण तत्वाचे राजकारण कधी सोडले नाही. विधानपरिषद दिली तर एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) पाईक म्हणून काम करु. पण आमच्यासाठी दिव्यांग बांधव महत्त्वाचे आहेत, असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.
दिव्यांग, शेतमजुरांसाठी शिंदेसोबत जाण्यास हरकत काय
कडू पुढे म्हणाले की, माझी मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांच्यासोबत चर्चा झाली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट झाली होती. पण या विषयावर चर्चा झाली नाही. विधान परिषदसाठी अर्ज भरायला कागदपत्र बॅगेत असतात. पण चर्चा व्हायला हवी, मुद्दे आमचे महत्त्वाचे आहेत. ‘प्रहार’वर अन्याय करण्याची कोणाची हिंमत किंवा कोणाची ताकद नाही. पत्रकार परिषदेनंतर फोन आला तर भेटायला जाऊ, असेही त्यांनी म्हटले. तसेच मीडियामधूनच मला विलिनीकरणाच्या प्रस्तावासंदर्भात कळाले. त्यावर चर्चा झाली पाहिजे. आमच्या वतीने शेतकरी दिव्यांगांच्या प्रश्नां संदर्भातील प्रस्ताव आहेत. चर्चेवेळी मी एकनाथ शिंदे यांच्याकडे संबंधित प्रस्ताव देईल, असे बच्चू कडू म्हणाले.