राज्यात फोडाफोडीचं राजकारण गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. ते संपूर्ण राज्याने पाहिलं आहे. पण हे राजकारण अद्यापही थांबलेलं नाही. याच फोडफोडीच्या राजकारणामुळे एकत्र आलेले सत्ताधारी शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातच आता वाद निर्माण झालाय. फोडाफोडीचं राजकारण आता या दोन्ही पक्षात अंतर्गतच सुरु झालय.
याच विषयावर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशिरा दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदेंनी महायुतीत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदेंनी तब्बल ५० मिनिटे अमित शाह यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. तसेच एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या नाराजीची कारणे थेट केंद्रीय नेतृत्वापुढे मांडली.
यावेळी एकनाथ शिंदेंनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार अमित शाहांकडे केली. रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच महायुतीत मिठाचा खडा पडत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले. महायुतीच्या उमेदवारांविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या स्थानिक नेत्यांना रवींद्र चव्हाण यांच्याकडून आर्थिक पाठबळ पुरवले जात आहे.
भाजपमध्ये मित्र पक्षातील नेत्यांना पक्षप्रवेश देण्यासाठी पैशांचा गैरवापर होत आहे. मित्र पक्षातील नेत्यांना फोडण्याच्या भाजपच्या आक्रमक रणनीतीमुळे युतीधर्म पाळला जात नाही. ही कृती शिवसेनेच्या नेत्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करणारी आहे, असे एकनाथ शिंदेंनी अमित शाहांना दिलेल्या तक्रारीत म्हटले.
दरम्यान डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेच्या ४ नगरसेवकांनी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. या फोडाफोडीच्या राजकारणामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवरही बहिष्कार टाकला होता. दरम्यान आता भाजपचे केंद्रीय नेतृत्व राज्यातील भाजप प्रदेशाध्यक्षांवर कारवाई करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.