महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. महायुतीला २३९ जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. त्यातच राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान मुख्यमंत्री आणि मंत्रीपदावरुन महायुतीमध्ये पेच निर्माण झालाय. विधानसभा निवडणुकीत महायुतीला न भुतो न भविष्य असं यश मिळाले. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मंत्रिपदाची चर्चा सुरु झाली. मुख्यमंत्रिपद भाजपलाच हवेय. त्याशिवाय शिवसेनेकडूनही मागणी करण्यात आली. पण भाजप मुख्यमंत्रीपदासाठी ठाम आहे. दरम्यान त्यांनी एकनाथ शिंदेंना दोन ऑफर दिल्या होत्या.
या दोन्ही ऑफर एकनाथ शिंदे यांनी धुडकावल्याची माहिती आता समोर आली आहे. मुख्यमंत्रीपदाऐवजी शिंदेंना केंद्रात मंत्रिपद आणि राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्याची ऑफर भाजपकडून देण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी या दोनही ऑफर धुडकावल्या आहेत. उपमुख्यमंत्रीपद आणि केंद्रातील मंत्रिपद एकनाथ शिंदे स्वत: घेणार नाहीत, असे समजतेय.
मुख्यमंत्रीपद मिळाले नाही, तर एकनाथ शिंदे राज्य मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहणार नाहीत. त्यांनी भाजपला तसा मेसेज दिल्याची माहिती सध्या समोर येत आहे . एकनाथ शिंदे फक्त पक्षप्रमुख म्हणून काम पाहणार असल्याचे समोर आलेय. त्याशिवाय राज्यात उपमुख्यमंत्रीपदासाठी दोन नावं महायुतीला देणार आहेत.
एकनाथ शिंदे पक्षप्रमुखाच्या भूमिकेत काम पाहणार असल्याचे सांगितले जात आहे . त्याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदासाठी २ जणांची नावे देणार आहेत, त्यामध्ये मागासवर्गीय किंवा मराठा चेहरा असू शकतो, असेही सांगण्यात आलेय.
दरम्यान आता मुख्यमंत्रीपद सोडण्यास भाजप तयार नाही. त्यामुळे शिवसेनेकडून गृहमंत्रालयाची मागणी करण्यात आली आहे. त्याशिवाय चांगल्या खात्याचीही शिंदे गटाकडून मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री पद न मिळाल्यास गृहमंत्रालय मिळणार का? याचीच चर्चा आता सर्वत्र सुरु झाली आहे.