दैनिक भ्रमर : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा जनता दरबा सुरु असताना हल्ला झाला. दिल्ली पोलिसांनीही या घटनेची पुष्टी केली आहे आणि गृह मंत्रालयाला त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे. आरोपी गुजरातमधील राजकोटचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे आणि तो प्राणीप्रेमी आहे.
पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि त्याची चौकशी करत आहे. त्याचे नाव राजेश भाई खिमजी भाई सकरिया ( वय ४१ ) असे असून तो ऑटो ड्रायव्हर आहे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीचा एक नातेवाईक तुरुंगात आहे. त्याने त्याची सुटका करण्यासाठी अर्ज आणला होता. दिल्ली पोलिसांनी त्या व्यक्तीबद्दल अधिक माहिती गोळा करण्यासाठी गुजरात पोलिसांशी संपर्क साधला आहे आणि त्याचे आधार कार्ड जारी करण्यात आले आहे.
पोलिस चौकशीदरम्यान, आरोपीच्या आईने सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या भटक्या कुत्र्यांबद्दलच्या निर्णयानंतर तो दिल्लीला आला होता. आईने सांगितले की तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे. तो प्राणीप्रेमी असल्याची चर्चा असून यापूर्वीही दिल्लीत गेला आहे. राजकोट पोलिसांनी आरोपीच्या आईलाही चौकशीसाठी घेतले आहे. आता पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.