सध्या राज्यात सर्वत्र पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळं आगामी काळात चांगला पाऊस व्हावा अशी अपेक्षा आहे. मात्र, सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला तर येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजनांना सुरुवात करावी. त्यामध्ये धरणातील पाणीसाठा पाहून जिल्हाधिकारी यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयातून काटकसरीने पाणी वापराचे नियोजन करावे. ग्रामीण भागात देखील विहिरी, तलावातील उपलब्धता पाहून पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
दरम्यान जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पावसाने ओढ दिल्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.
कोणत्या विभागात पावसाची काय स्थिती?
राज्यात कोकण आणि नागपूर विभागात हलका पाऊस झाला आहे. मात्र नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती या विभागात पाऊस झालेला नाही. राज्यात सरासरीच्या 25 ते 50 टक्के पाऊस झालेल्या तालुक्यांची संख्या 15 आहे, तर 50 ते 75 टक्के पर्जन्यमान झालेल्या तालुक्यांची संख्या 108 तर 75 ते 100 टक्के पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांची संख्या 138 असून 94 तालुक्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
चारा उत्पादनासाठी डीपीडीसीतून निधी
जिल्हाधिकाऱ्यांनी चाऱ्याच्या उत्पादनवाढीसाठी जिल्हा नियोजन विकास निधीतून शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबर कमी पावसामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी तातडीने निधी खर्च करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. वन विभागाने गवताचा लिलाव करु नये, गवत राखीव ठेऊन त्याच्या पेंढ्या करण्याच्या सुचना देखील पवार यांनी दिल्या.