राज्यात लवकरच कर्जमाफीचा निर्णय; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा
राज्यात लवकरच कर्जमाफीचा निर्णय; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा
img
वैष्णवी सांगळे
राज्यात लवकरच कर्जमाफीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. स्वतः मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर भाष्य केलं आहे. राज्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या गरीब शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार ठोस पावले उचलणार असून, शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द निश्चितपणे पाळला जाईल, असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. 

वर्षानुवर्षे शेतात कष्ट करणाऱ्या, पण वाढत्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या गरीब शेतकऱ्यांसाठीच ही कर्जमाफी असेल, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.फार्महाऊसधारक, मोठ्या जमिनीचे मालक किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकऱ्यांचा विचार न करता, प्रत्यक्ष शेती करून उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, असे बावनकुळे यांनी ठामपणे सांगितले.

कर्जावर व्याज आणि व्याजावर व्याज वाढत असल्यामुळे शेतकरी आत्महत्येचा विचार करतो, मात्र अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना एकटे सोडणार नाही. गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार करणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितले. धाराशिव जिल्ह्यातील येणेगुर येथे झालेल्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं असून, पुढील काळात शेतकऱ्यांना कर्ज घ्यावं लागू नये, असा विचारही सरकार करत असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

गरीब शेतकरी 40 - 40 वर्षे शेतात राबतात. कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा विचार करतात. या शेतकऱ्यांना आम्ही आत्महत्या करू देणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे महायुती सरकारकडून लवकरच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्य सरकार कर्जमाफीच्या निर्णयाची घोषणा कधी करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

मात्र, बावनकुळे यांनी फक्त गरीब शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळेल, असे म्हटले आहे. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांच्या निकषात नेमके कोणते शेतकरी बसणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना वगळले जाणार, शेतकऱ्यांची गरिबी ठरवण्याचा मापदंड काय असणार, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group