सध्या देशात कांद्यावर निर्यातबंदी लावण्यात आली आहे. मात्र, टोमॅटोच्या नावाखाली परदेशात कांद्याची तस्करी होत असल्याची घटना समोर आली आहे. टोमॅटोच्या कंटेनरमध्ये 82.93 मॅट्रिक टन कांदा लपवून परदेशात पाठवण्यात येत होता. नाशिकच्या दोन निर्यातदारांनी टोमॅटोच्या कंटेनरमध्ये टोमॅटोच्या पेट्यांमागे कांदा पॅक करुन UAEला पाठवण्यात येत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या टीमला मिळाली होती.
त्यानुसार, टीमने सापळा रचला होता. त्यानसार सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा कांदा जप्त करत कारवाई केली आहे. नाशिकच्या दोन निर्यातदारांनी टोमॅटोच्या कंटेनरमध्ये टोमॅटो पेट्यांमागे कांदा पॅक करुन UAE ला पाठवण्याची तयारी केली होती. मात्र, सीमा शुल्क विभागाच्या नागपूरच्या टीमने मुंबईला जाऊन कंटेनरची तपासणी केली. तेव्हा कंटेनरच्या समोरच्या भागांमध्ये टोमॅटोचे बॉक्स होते, तर त्यामागे कांद्याची पोती लपवून तो UAE ला पाठवण्यात येत असल्याचे आढळून आले.
दरम्यान केंद्र सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निराश करणारा निर्णय 8 डिसेंबरला घेतला होता. सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. स्थानिक बाजारपेठांतील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला होता.
भारताचा कांदा हा विविध देशांमध्य निर्यात केला जातो. भारतीय कांद्याला परदेशात मोठी मागणी देखील आहे. बांगलादेश, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिराती हे तीन प्रमुख कांद्याचे आयातदार देश आहेत. मात्र, अचानक सरकारनं निर्यातबंदीचं हत्यार उपसलं आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
केंद्र शासनाकडून 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदीचा घेतला निर्णय घेतला आहे. या निर्णयावर शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर बहुतांश ठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आले होते.