
लासलगाव : कांद्याचा आगार म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर घसरणीचा कल कायम असून, सरासरी भाव केवळ 900 ते 1,000 रुपयांपर्यंत खाली आले आहेत.
दरम्यान, दीपावली सण व साप्ताहिक सुट्ट्यांमुळे 18 ऑक्टोबरपासून पुढील सात दिवस कांदा व धान्य लिलाव बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. आज सकाळच्या सत्रात बाजार समितीत तब्बल 500 वाहनांमधून शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा विक्रीसाठी आणला होता. या कांद्याला कमाल दर 1,340 रुपये, किमान 300 रुपये तर सरासरी 900 ते 1,000 रुपये इतका भाव मिळाला. नाफेड एनसीसीएफचा कांदा बाजारात विक्री होत आहे तर नवीन लाल कांदा कर्नाटक, आंध्र प्रदेश असे राज्यात काही ठिकाणी बाजार समितीमध्ये येत असल्याने कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्यामुळे या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सध्याच्या परिस्थितीत कांद्याला समाधानकारक दर मिळत नसल्याने आणि बाजार सात दिवस बंद राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विक्री झालेल्या तसेच विक्रीसाठी थांबलेल्या कांद्याला सरकारने प्रति क्विंटल किमान एक हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
नुकसान, साठवणुकीतील कांदा सडणे आणि बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. काही ठिकाणी तर उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले आहे. ऐन सणासुदीच्या काळात आलेल्या या आर्थिक संकटामुळे दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक कुटुंबांना पडला आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत आज उन्हाळ कांद्याची अंदाजे १२००० क्विंटल आवक झाली व त्या कांद्याला कमीत कमी ४०० रुपये जास्तीत जास्त १४०० रुपये तर सरासरी १०७५ रुपये प्रति क्विंटल असा बाजार भाव मिळाला. मात्र उत्पादन खर्च प्रति किलो १० ते १५ रुपये होत असल्यामुळे कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. तसेच नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे तर काही शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा सडत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.