शेतकरी पुन्हा संकटात , कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल
शेतकरी पुन्हा संकटात , कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल
img
वैष्णवी सांगळे
शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. अतिवृष्टी आणि निसर्गाच्या लहरीपणातून वाचलेला कांदा आता बाजारात दाखल होत आहे. उशिराने सुरू झालेली ही आवक आता एकाचवेळी वाढली आहे. मात्र देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी घटल्याने कांद्याचे दर कोसळले आहेत. एकीकडे उत्पादन खर्च ३५ टक्क्यांनी वाढलेला असताना हाती येणारा दर तोकडा असल्याने कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

बांगलादेशने देखील भारतीय कांद्याची आयात थांबवल्याने भारतात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत, ज्यामुळे शेतकरी संतापले आहेत. तर इकडे दक्षिण भारतात कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशमध्येही कांद्याचे उत्पादन अतिरिक्त आहे.येथे कांद्याची मुबलकता असल्याने महाराष्ट्रातील कांद्याला मागणी कमी झाली आहे. महाराष्ट्रात नाशिकसह पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर पट्ट्यातही आवक वाढल्याने दरावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. परराज्यातील कांद्याची उपलब्धता आणि स्थानिक बाजारात एकदाच वाढलेल्या विक्रमी आवकेमुळे दर कमालीचे दबावाखाली आले आहेत.

उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी आक्रमक झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, येवला बाजार समितीत ७०० वाहनांमधून आलेल्या लाल कांद्याला सरासरी ६०० ते ८०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. कमाल १२५१ रुपये, तर किमान २५१ रुपये प्रति क्विंटल असा दर शेतकऱ्यांच्या पदरी पडला. हा भाव उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याने शेतकरी हवालदिल आहेत.

बांगलादेश हा एकेकाळी भारतीय कांद्याचा सर्वात मोठा आयातदार होता, परंतु आता दोन्ही देशांमधील संबंध पूर्वीसारखे राहिलेले नाहीत आणि बांगलादेशातही कांद्याचे मोठे उत्पादन झाल्याने त्यांनी नवीन आयात परवानग्या नाकारल्या आहेत. इतर राज्यात कांद्याचे उत्पादन चांगले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group