महागाईचा महाभडका! व्यावसायिक गॅसनंतर आता घरगुती सिलेंडरही महागणार?
महागाईचा महाभडका! व्यावसायिक गॅसनंतर आता घरगुती सिलेंडरही महागणार?
img
नितीशा कुलकर्णी







आधीच महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना आता पुन्हा एकदा 'गॅस' दरवाढीचा चटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या १५ वर्षांत दुपटीने वाढलेले गॅसचे दर आता १००० रुपयांचा टप्पा ओलांडण्याच्या तयारीत असून, यामुळे गृहिणींचे बजेट पूर्णपणे कोलमडणार आहे.

गेल्या १५ वर्षांत घरगुती गॅसच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली असून त्या दुपटीहून अधिक झाल्या आहेत. आधीच महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांना आता पुन्हा गॅस दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात ६० रुपयांनी दरवाढ झाल्यानंतर आता आणखी वाढ होण्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, १ मे रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर ताण वाढला आहे. 

व्यावसायिक गॅस दरवाढीचा धक्का

१ मे रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ करण्यात आली. या अचानक झालेल्या दरवाढीमुळे हॉटेल आणि खानावळींचे दर वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, बाहेर जेवण करणे महागले असून नोकरदार आणि विद्यार्थ्यांच्या खर्चात मोठी वाढ होणार असल्याचे चित्र दिसते.

घरगुती गॅस दरवाढीची शक्यता

मिळालेल्या माहिती नुसार घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात ४० ते ५० रुपयांपर्यंत वाढ होण्याची शकता वर्तवली जातेय. आधीच सिलेंडरचे दर १००० रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत आणखी वाढ झाल्यास सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गृहिणींच्या किचन बजेटवर मोठा परिणाम

गॅस दरवाढीमुळे गृहिणींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अनेक कुटुंबांना खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी पर्याय शोधावे लागू शकतात. काही ठिकाणी पुन्हा चुलीचा वापर करावा लागेल का, असा सवाल उपस्थित होत आहे. शहरातील फ्लॅट संस्कृतीतही याचा परिणाम दिसू शकतो.

जागतिक बाजाराचा परिणाम

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने चढउतार होत आहेत. याचा परिणाम स्थानिक इंधन दरांवर होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सरकारने कर आणि उपकर कमी करून महागाईचा थेट फटका कमी ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता जागतिक स्तरावर किंमती वाढत असल्याने पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीची शक्यता वाढली आहे.

सरकारची भूमिका 

पेट्रोलियम मंत्र्यांनी दरवाढीच्या चर्चांना नकार दिला असला, तरी विविध अहवालांनुसार व्यावसायिक गॅसनंतर घरगुती गॅसच्या दरातही वाढ होऊ शकते. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group