देशातील घरगुती स्वयंपाकाच्या इंधनाच्या वापरात मोठा बदल घडवून आणण्याच्या दिशेने केंद्र सरकारने पाऊल टाकले आहे. LPG सिलिंडरऐवजी पाईपद्वारे नैसर्गिक गॅस (PNG) वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी सरकारने सिटी गॅस वितरण कंपन्यांसाठी विशेष प्रोत्साहन योजना आणली आहे. १ सप्टेंबर २०२६पासून लागू होणाऱ्या या योजनेत पात्र कंपन्यांना लक्ष्यापेक्षा अधिक नवीन PNG कनेक्शन दिल्यास प्रत्येक कनेक्शनमागे २०० SCM अतिरिक्त स्वस्त घरगुती गॅस दिला जाणार आहे. त्यामुळे देशातील PNG नेटवर्कचा विस्तार वेगाने होण्याची शक्यता आहे.
नवे कनेक्शन वाढवण्यासोबतच आधीपासूनच जोडणी झालेले निष्क्रिय कनेक्शन पुन्हा सुरू करण्याचाही सरकारचा मानस आहे. सरकारची योजना काय? केंद्र सरकारच्या नव्या योजनेनुसार, योग्य सिटी गॅस डिस्ट्रिब्युटर (CGD) कंपन्यांना त्यांच्या परिसरात ठरवून दिलेल्या टार्गेटपेक्षा अधिक नवे देयके असलेले घरगुती पीएनजी कनेक्शन (PNG Connection) दिल्यास प्रत्येक कनेक्शनसाठी अतिरिक्त २०० मानके घन मीटर (SCM) घरगुती गॅस देण्याची तरतूद करण्यात येणार आहे. ही योजना कंपन्यांसाठी फायदेशीर असून, १ सप्टेंबरपासून ही योजना लागू होईल. ही योजना दोन टप्प्यांत लागू करण्यात येईल. प्रत्येक टप्प्याचा कालावधी सहा महिन्यांचा असेल. अतिरिक्त देण्यात येणारे गॅस स्वस्त असेल.
कंपन्यांना मोठा आर्थिक दिलासा वृत्तानुसार, अतिरिक्त मिळणाऱ्या स्वस्तातल्या गॅसच्या माध्यमातून शहरी गॅस वितरक कंपन्या महागड्या एलएनजी (LNG) ची खरेदी काही प्रमाणात कमी करू शकतील. यामुळे कंपन्यांच्या एकूण गॅस खरेदीत घट होईल. घरगुती पीएनजी नेटवर्क वाढवण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेली गुंतवणूक अधिक फायदेशीर होईल. सरकारच्या अंदाजानुसार, या योजनेच्या माध्यमातून घरगुती पीएनजी कनेक्शनवर केलेली गुंतवणूक वसूल करण्यासाठी लागणारा कालावधी १० वर्षांवरून कमी होऊन तो जवळपास ३ वर्षांवर येईल. देशात १.७४ कोटींहून अधिक पीएनजी कनेक्शन भारतात सध्याच्या घडीला जवळपास १.७४ कोटी घरगुती पीएनजी कनेक्शन आहेत. सरकार पाईपद्वारे पुरवले जाणारे गॅस एलपीजी सिलिंडरच्या तुलनेत अधिक सोयीचं करण्यास प्रोत्साहन देत आहे. पीएनजी कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना गॅस सिलिंडरसारखं वारंवार बुकिंग करावं लागत नाही किंवा डिलिव्हरीची वाट बघावी लागत नाही. पाईपद्वारे गॅस पुरवठा सुरुच असतो आणि मीटरप्रमाणे बिल अदा करावं लागतं.
? LPG वरून PNG कनेक्शन वाढवण्यावर भर पश्चिम आशियातील युद्धसंकट गडद झाल्यानंतर त्या दरम्यानच्या कालावधीत एलपीजी पुरवठ्यात आव्हान निर्माण झालं होतं. त्यानंतर सरकारनं पीएनजी नेटवर्क वाढवण्यावर भर दिला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, मार्चपासून आतापर्यंत ५ लाखांहून अधिक पीएनजी कनेक्शन देण्यात आले आहेत. तर ५.७ लाखांहून अधिक ग्राहकांनी नव्या कनेक्शनसाठी नोंदणी केली आहे. घरगुती एलपीजी कनेक्शन सरेंडर करून पीएनजी जोडणी घ्यावी, असे आवाहनही सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच PNG Drive 2.0 अंतर्गत जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. ज्या सोसायट्यांमध्ये रहिवासी एलपीजी सिलिंडरचा वापर करत आहेत, त्यांनी पीएनजी कनेक्शन घ्यावे, यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.