1 एप्रिलची सकाळ व्यावसायिक आणि हॉटेल चालकांसाठी मोठा दणका देणारी ठरली आहे. पश्चिम आशियात अमेरिका-इस्रायल आणि अमेरिकेमधील संघर्ष चिघळत असताना जागतिक तेल दरांमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर, बुधवारी व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत 218 रुपयांची वाढ करण्यात आली. आजपासून लागू झालेल्या या नवीन दरांचा थेट परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि व्यवसायांवर होणार आहे. त्यामुळे आखातात सुरु असलेल्या युद्धाचा फटका आता व्यवसायांवर आणि अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे.
माहितीनुसार, आता दिल्लीत सिलेंडरसाठी 194 रुपये, चेन्नईत 203 रुपये, मुंबईत 196 रुपये आणि कोलकातामध्ये 218 रुपये अधिक मोजावे लागतील. मात्र, यावेळी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तर एका महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात झालेली ही तिसरी दरवाढ झाली आहे.
या दरवाढीनंतर, दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत पूर्वीच्या 1884.50 रुपयांवरून 2078. 50 रुपये झाली आहे. मुंबईत किंमत ₹2031 वर पोहोचली आहे. कोलकातामध्ये 19-किलोग्राम सिलेंडरची किंमत आता 2208 रुपये झाली आहे. चेन्नईमध्ये आता सिलेंडर ₹2246.50 ला उपलब्ध होईल. पाटण्यात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा दर ₹2365 पर्यंत वाढला आहे, तर जयपूरमध्ये त्याची किंमत ₹2031 पर्यंत वाढली आहे.
LPG पुरवठ्याबाबत केंद्राकडून व्यावसायिक अद्ययावत माहिती
31 मार्च रोजी LPG पुरवठ्याच्या स्थितीबाबत केंद्र सरकारकडून नवीन निवेदन जारी केले गेले. ग्राहकांसाठी व्यावसायिक LPG चा पुरवठा 20% पर्यंत पूर्ववत करण्यात आल्याचे केंद्राने आपल्या निवेदनात म्हटले तर, भारत सरकारने 18.03.2026 रोजीच्या पत्राद्वारे, PNG विस्तारासाठी Ease-of-Doing-Business सुधारणांच्या आधारे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अतिरिक्त 10% व्यावसायिक एलपीजी वितरीत करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.