सावधान ! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली सायबर भामट्यांचा सुळसुळाट
सावधान ! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली सायबर भामट्यांचा सुळसुळाट
img
वैष्णवी सांगळे
इराण अमेरिका इस्त्रायल युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसायला सुरुवात झाली आहे. आखाती देशातील या युद्धामुळे कच्या तेलाची निर्यात बंद झाल्याने अनेक देशांमध्ये इंधन टंचाई निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. देशासह महाराष्ट्रात देखील गॅस टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक शहरात एलपीजी गॅस बुकिंग आणि सिलेंडर नेण्यासाठी एजन्सीबाहेर नागरिक मोठी गर्दी करत आहे. 

याच परिस्थितीचा काही सायबर भामट्यांनी फायदा घेतला आहे. सायबर गुन्हेगार आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसचा तुटवडा, इराण-इस्त्रायल युद्धाचा फायदा उचलत लोकांना गंडा घालत आहेत. गॅस टंचाईने नागरिक अगोदरच भयभीत झाले आहेत. त्यातच सायबर भामटे नागरिकांशी संपर्क करून गॅस कनेक्शन कट करण्याची भीती दाखवून गंडा घालत आहेत. आतापर्यंत मुंबईत चार दिवसांत 26 लाख रुपयांची लूट सायबर भामट्यांनी केली आहे.

माहितीनुसार, हे सायबर ठग महानगर गॅस लिमिटेडचे अधिकारी असल्याचे भासवून फोन करत आहेत. तुमचे गॅसचे बिल थकलेले आहे आणि कनेक्शन आता कापणार असल्याची धमकी देत गंडा घालत आहेत. हे कनेक्शन वाचवण्यासाठी अगोदर 10-20 रुपये भरण्यास सांगितले जाते. त्यानंतर ‘mahanagar apk’ फाईल डाऊनलोड करण्यास सांगण्यात येते. त्यावर क्लिक करताच ग्राहकांच्या बँक खात्यातील रक्कम उडवण्यात येते.

गेल्या चार दिवसात विले पार्ले, वडाळा सारख्या भागातून सायबर फसवणुकीच्या चार घटना समोर आल्या आहेत. यामध्ये ग्राहकांना आतापर्यंत एकूण 26 लाख 43 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. दरम्यान महानगर गॅसने ग्राहकांना अशा सायबर भामट्यांपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अधिकृत क्रमांकावरच संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. तर ग्राहकांना कंपनी कोणत्याही प्रकारची लिंक डाऊनलोड करण्यास सांगत नसल्याचे म्हटले आहे. ग्राहकांनी अधिकृत नंबरशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले. तर सायबर भामट्यांपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 







इतर बातम्या
Join Whatsapp Group