अलीकडच्या काळात गगनाला भिडलेल्या महागाईमुळे जनतेच्या अडचणी वाढल्या आहेत अशाच महागाईने पिचलेल्या जनतेसाठी एक आनंदाची बातमी आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाने सामान्य जनतेला थोडा दिलासा मिलनर आहे.
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सिलिंडरचे दर तब्बल १५७ रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. मात्र, ही कपात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे व्यावसायिक सिलिंडर वापरणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
दरम्यान सरकारी तेल कंपन्यांनी १ सप्टेंबर रोजी घरगुती गॅस आणि व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किमती अपडेट केल्या आहेत. नव्या किंमतीनुसार, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात आज कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, व्यावसायिक गॅस सिलिंडर तब्बल १५७ रुपयांनी स्वस्त झाला आहे.
या बदलामुळे देशाची राजधानी नवी दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत १५२२.५० रुपये झाली आहे. यापूर्वी या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १७८० रुपयांवर पोहोचली होती.
दरम्यान, राखी पौर्णिमेच्या एका दिवस आधी म्हणजेच मंगळवारी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत २०० रुपयांनी कपात करण्यात आली होती. ३३ कोटी ग्राहकांसाठी २०० रुपयांनी सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली होती.
जाणून घ्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचे नवे दर किती?
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १५७ रुपयांची कपात केल्यानंतर दिल्लीत व्यावसायिक गॅसची किंमत १५२२.५० रुपये इतकी झाली आहे. याआधी दिल्लीत गॅस सिलिंडर १६८० रुपयांना मिळत होता. कोलकातामध्ये आजपासून सिलिंडर १८०२.५० रुपयांऐवजी १६३६ रुपयांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे, यापूर्वी त्याची मुंबईत किंमत १६४९.५० रुपये होती, जी आता १४८२ रुपयांवर आली आहे.