नाशकात गॅस गळतीमुळे भीषण स्फोट,  दोन जण गंभीर जखमी
नाशकात गॅस गळतीमुळे भीषण स्फोट, दोन जण गंभीर जखमी
img
Dipali Ghadwaje
सर्वत्र नववर्षाचा आनंदोत्सव साजरा होत आहे. यातच नाशिक शहरात एक धक्कादायक घटना घडली. नाशिकच्या इंदिरानगर परिसरात सोमवारी गॅस गळतीमुळे भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यात दोन जण जखमी झाले आहेत. सिलेंडरची जोडणी करताना गॅस गळती झाल्यामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार , इंदिरानगर परिसरात एका पार्सल पॉईंटवर सोमवारी (दि. 01 जानेवारी 2024) सकाळी  गॅस गळतीमुळे अचानक भडका उडला. कलानगर चौकातील वक्रतुंड पार्सल पॉईंट येथे ही दुर्घटना घडली. 

सकाळी पार्सल पॉईंटचे दुकान उघडल्यानंतर दोन व्यक्तींनी इलेक्ट्रिक सप्लायचे बटन सुरु केले. त्यानंतर मोठा भडका उडाला. यानंतर दुकानात असलेले दोन जण बाहेर फेकले गेले. दुकानातील सामानदेखील यावेळी बाहेर फेकले गेले. यात दोन जण ५० ते ६० टक्के भाजले असल्याचे समजते. 

दरम्यान रात्रीच्या वेळी गॅस गळती झाली असावी, सकाळी इलेक्ट्रिक सप्लायचे बटन सुरु करताच स्पार्क होऊन भडका उडाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्फोट होताच याठिकाणी मोठी आग भडकली होती. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. यात दुकानदाराचे मोठे नुकसान झाले आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group