उद्यापासून देशात होणार 'हे' महत्त्वाचे बदल;  तुमच्या खिशावर असा होणार परिणाम ; आत्ताच जाणून घ्या
उद्यापासून देशात होणार 'हे' महत्त्वाचे बदल; तुमच्या खिशावर असा होणार परिणाम ; आत्ताच जाणून घ्या
img
Dipali Ghadwaje
उद्यापासून सप्टेंबर महिना सुरू होत आहे आणि प्रत्येक महिन्याप्रमाणे सप्टेंबर 2023 मध्ये अनेक नियम बदलणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या स्वयंपाकघरापासून ते शेअर बाजारातील तुमच्या गुंतवणुकीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर होणार आहे. एवढेच नाही तर देशातील अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी सप्टेंबर महिना ही अंतिम मुदत आहे.
 
एलपीजी सिलेंडरच्या किमती 
देशातील ऑईल आणि गॅस वितरण कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅसच्या किमतींत बदल करतात. अशा परिस्थितीत 1 सप्टेंबरपासून LPG सिलेंडर्सच्या किमतींमध्ये बदल पाहायला मिळणार आहे. घरगुती एलपीजी सिलेंडर्सच्या किमतींत मोठा दिलासा देत केंद्र सरकारनं दोन दिवस अगोदर 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात 200 रुपयांची कपात केली आहे. यानंतर बुधवारपासून देशभरातील घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी सिलिंडरचे दर कमी करण्यात आले आहेत. 

CNG-PNG आणि एअर फ्यूएलच्या दरांत बदल  
एलपीजीच्या किमतींसोबतच, तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला हवाई इंधनाच्या  किमती बदल करतात, त्यामुळे यावेळेस सप्टेंबरच्या पहिल्या तारखेलाही CNG-PNG च्या दरांत बदल केला जाऊ शकतो. याशिवाय उद्यापासून देशात सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीतही बदल केला जाऊ शकतो. त्याचा परिणाम सर्वसामान्यांना स्वयंपाकघरापासून ते त्यांच्या प्रवासापर्यंतही जाणवू शकतो.

आयपीओसाठी T+3 नियम  
मार्केट रेग्युलेटर सेबी नं Initial Public Offering म्हणजेच, आयपीओ बंद झाल्यानंतर शेअर मार्केटमध्ये कंपनीच्या स्टॉक्सची लिस्टिंग होण्याची वेळ मर्यादा अर्ध्यापर्यंत म्हणजेच, तीन दिवसांपर्यंत केली आहे. यापूर्वी ही वेळ मर्यादा सहा दिवसांची होती. लिस्टिंगच्या या नव्या नियमामुळे आयपीओ जारी करणाऱ्या कंपन्यांसोबतच इन्वेस्टमेंट करणाऱ्यांनाही फायदा होणार आहे. SEBI नं यासंदर्भात यापूर्वीच अधिसूचना जारी केली आहे. आपल्या अधिसूचनेत सेबीनं म्हटलं आहे की, 1 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यानंतर येणार्‍या सर्व IPO साठी लिस्टिंगच्या वेळेचे नवीन नियम स्वेच्छेनं लागू केले जातील. तसेच, 1 डिसेंबर 2023 पासून, कंपन्यांना नियमांचं पालन अनिवार्यपणे करावं लागेल. SEBI नं 28 जून रोजी झालेल्या बैठकीत T+3 नियमाला मान्यता दिली होती.

'या' क्रेडिट कार्डचे नियम बदलणार   
1 सप्टेंबर 2023 अॅक्सिस बँकेचे मॅग्नस क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची असणार आहे. सप्टेंबरच्या एक तारखेपासून या क्रेडीट कार्डाच्या अटी आणि शर्तींमध्ये मोठे बदल होऊ शकतात. बँकेच्या वेबसाईटवर शेअर केलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यापासून ग्राहक काही व्यवहारांवर विशेष सवलतींचा लाभ घेऊ शकणार नाहीत. एवढंच नाही तर या क्रेडिट कार्डशी संबंधित आणखी एक धक्कादायक बदल पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे 1 सप्टेंबरपासून नवीन कार्डधारकांना वार्षिक शुल्कही भरावं लागणार आहे, याची माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे.

सप्टेंबरमध्ये 16 दिवस बँक हॉलिडे 
सप्टेंबर महिन्यात बँकेशी संबंधित कोणतंही महत्त्वाचं काम असेल तर, आधीच पूर्ण करुन घ्या. कारण संपूर्ण महिन्याभरात तब्बल 16 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. RBI ने बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये होणाऱ्या सण आणि कार्यक्रमांनुसार या बँक सुट्ट्या बदलू शकतात. यामध्ये रविवार, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. एकीकडे कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी आणि ईद-ए-मिलाद-उन-नबी हे सण पुढील महिन्यात 2023 च्या सप्टेंबरमध्ये येत आहेत, तर दुसरीकडे 3, 9, 10, 17, 23 आणि 24 सप्टेंबरला रविवार आणि दुसरा-चौथा शनिवार यामुळे बँकांमध्ये कामकाज होणार नाही.

ही महत्त्वाची कामे सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा

2,000 रुपयांच्या नोटा बदलण्याची शेवटची तारीख:
देशातील चलनातून बाद झालेल्या 2,000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी केवळ सप्टेंबरपर्यंतच वेळ आहे. त्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 रोजी संपेल. अशा परिस्थितीत, जर तुमच्याकडे या नोटा असतील आणि तुम्ही त्या आतापर्यंत बदलल्या नाहीत, तर हे काम लवकरात लवकर करा.

आधार अपडेट करण्याची शेवटची संधी
जर तुम्हाला तुमचा आधार मोफत अपडेट करायचा असेल, तर तुमच्याकडे हे काम करण्यासाठी फक्त 14 सप्टेंबर 2023 पर्यंत वेळ आहे. UIDAI ने आधार अपडेट करण्याची सुविधा मोफत दिली असून ही मुदत 14 सप्टेंबर रोजी संपत आहे.

 डीमॅट खाते नॉमिनेशनची अंतिम मुदत:
जर तुम्ही आतापर्यंत तुमच्या डिमॅट खात्याचे नॉमिनेशन केले नसेल, तर त्यासाठी तुमच्याकडे फक्त सप्टेंबर महिना आहे. हे काम करणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण नॉमिनेशन नसलेले खाते बाजार नियामक सेबीद्वारे निष्क्रिय केले जाऊ शकते. जर तुम्ही खात्यात नॉमिनेशन ची प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर ती करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group