सोशल मीडियावर मेसेज करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळेल, असे प्रलोभन दाखवून ४४ वर्षीय महिलेची २७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती वागळे इस्टेट पाेलिसांनी बुधवारी दिली.
या घटनेतील तक्रारदार ४४ वर्षीय महिला या ठाण्यातील रघुनाथनगर परिसरात वास्तव्याला आहे. दाेन अनाेळखींनी तिला १० जानेवारी ते फेब्रुवारी २४ या कालावधीत इन्स्टाग्राम अकाउंट व मोबाइलवर मॅसेज करून ऑनलाइन शेअर मार्केटमधून शेअर्स व आयपीओ खरेदी केल्यास मोठा परतावा मिळेल, अशा बतावणीचा मेसेज पाठविला. त्यासाठी एक लिंकही तिला पाठविण्यात आली.
त्यानंतर तिचा विश्वास संपादन करून शेअर खरेदीच्या नावाखाली २७ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र, काेणताही परतावा किंवा मुद्दल रक्कम परत न करता, तिची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने २ एप्रिल २४ राेजी वागळे इस्टेट पाेलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (क), ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.