
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- स्टोअरकरिता येणार्या मालाची गाडी खाली करून देणार नाही, तुमचे शॉप बंद करून टाकीन, अशी धमकी देऊन १ लाख ८० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करणार्या श्रमिक माथाडी संघटनेच्या एका प्रतिनिधीला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी अनिल राजाराम शेंडगे (रा. काकड बाग, मोरे मळा, हनुमानवाडी, पंचवटी) याने कॅनडा कॉर्नर येथील वसंत मार्केटमध्ये असलेल्या श्रमिक माथाडी व गार्ड बोर्ड संघटनेचा प्रतिनिधी आहे. शेंडगे हा फिर्यादी सुधीर सिना सालेयन (रा. संतोषी उषाकिरण सोसायटी, सावरकरनगर, नाशिकरोड) यांच्या शॉपमध्ये, तसेच सिटी सेंटर मॉलमधील टाईम झोन गेम सेंटरचे मॅनेजर प्रमोद पावसे, रिलायन्स सेंट्रोचे मॅनेजर किशोर गायकवाड, पीव्हीआर सिनेमाचे मॅनेजर विवेक शिवदास, एमआयडीआयआयचे मॅनेजर दादासाहेब गवळी, रिलायन्स ट्रेंडचे मॅनेजर कुणाल दोंदे व रिलायन्स डिजिटलचे मॅनेजर श्रीकांत सोनवणे यांना त्यांच्या शॉपमध्ये येऊन भेटला
तसेच आरोपीने फिर्यादीसह इतर शॉपमध्ये येणार्या मालाची गाडी कामगारांना सांगून खाली करून देणार नाही, तुमचे शॉप बंद करून टाकीन, अशी धमकी देऊन दरमहा पैशाची मागणी केली, तसेच फिर्यादीस "तुझ्या स्टोअरकरिता आलेल्या मालाची गाडी खाली होऊ देणार नाही. त्याच गाडीखाली तुला घालून चिरडून मारीन,” अशी धमकी देऊन फिर्यादीची इच्छा नसताना त्याच्याकडून दहा हजार रुपयांप्रमाणे खंडणीची मागणी केली व दर महिन्याच्या एक तारखेला ही रक्कम स्वीकारून फिर्यादीकडून १ लाख ८० हजार रुपये, तसेच इतर साक्षीदारांकडूनदेखील पैशांची मागणी करून श्रमिक माथाडी संघटनेची दिनांकविरहित पावती देऊन कोणतेही कामगार पुरविले नाहीत.
याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अनिल शेंडगे याला अटक केली आहे. हा प्रकार सिटी सेंटर मॉलमधील दुसर्या मजल्यावर होम टाऊन शॉप येथे घडला.