नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. चौथ्या मजल्यावरील बाल्कनीत खेळत असताना तोल जाऊन ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नरहरी नगर येथे असलेल्या एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील बाल्कनीत खेळत असताना रविवारी ( २५ जानेवारी ) सायंकाळच्या सुमारास ७ वर्षीय चिमुरडा तोल जाऊन खाली पडला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या चिमुरड्याला दुर्दैवाने आपले प्राण गमावे लागले आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कीयांश प्रफुल्ल बेदाडे (वय 6 वर्ष, रा. शिवगंगा रेबिन्यू नरहरी नगर पाथर्डी फाटा, नाशिक) असं या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या बालकाचं नाव आहे.
कियांश हा आपल्या इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील घरातील गॅलरीमध्ये खेळत होता. खेळत असताना अचानक गॅलरी मधून त्याचा तोल गेला आणि तो थेट चौथ्या मजल्यावर खाली जमिनीवर कोसळला. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याने कीयांश हा गंभीर जखमी झाला होता. घटना लक्षात येताच तातडीने त्याच्या घरच्यांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, मात्र दुर्दैवाने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनं बेदाडे परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.