नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शेअर मार्केट ट्रेडिंगच्या बहाण्याने जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका इसमास 99 लाख 50 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हे घरी असताना एका व्हॉट्सअॅप क्रमांकावर अज्ञात इसमाने फोन करून चॅटिंग सुरू केली. चॅटिंग करणार्या व्यक्तीने बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेडिंगच्या बहाण्याने जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर फिर्यादीने अज्ञात व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.
अज्ञात व्यक्तीने सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण 99 लाख 50 हजार 510 रुपये ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले. एवढे पैसे गुंतवूनही नफ्याचे पैसे तर मिळाले नाहीत; पण मूळ रक्कमही परत न करता फिर्यादीची फसवणूक केली.
हा प्रकार दि. 8 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान घडला. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे करीत आहेत.