नाशिक महापालिकेच्या ३१ प्रभागांतील एकूण १२२ जागांचा निकाल काल समोर आला. नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपने तब्बल ७२ जागांवर विजय मिळवला असून नाशिकमध्येही भाजपच मोठा पक्ष ठरला आहे. नाशिकमध्ये भाजप ७२ , शिवसेना शिंदे गट - २६ जागा , शिवसेना ठाकरे गट १५, काँग्रेस- ३, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४, तर मनसेला एक आणि अपक्ष उमेदवार एका जागेवर विजयी झाले आहे.
यंदाच्या महापालिका निवडणुकीत १२२ पैकी पाच जणांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला तर पाच जणांचा अगदी कमी मतांनी पराभव झाला. हे विजयी आणि पराभूत नेमके कोण पाहुयात.
सर्वात जास्त मतांनी निवडून आलेले -
सुधाकर बडगुजर - प्रभाग क्रमांक २५ मध्ये सुधाकर बडगुजर यांचा सर्वाधिक मताधिक्याने विजय झाला आहे. बडगुजर यांना एकूण १९ हजार ८३४ इतकी मते मिळाली असून, त्यांचा १४ हजार ८६४ मतांनी विजय झाला आहे.
दिपाली गीते - प्रभाग क्रमांक १ मध्ये गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक गणेश गीते यांच्या पत्नी दिपाली गीते या ११ हजार ३१५ मतांनी निवडून आल्या असून, त्यांना एकूण १६ हजार ६४२ इतकी मते पडली.
दिनकर पाटील - ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेतून भाजपमध्ये गेलेले दिनकर पाटील हे देखील ९ हजार ४४३ मतांनी विजयी झाले असून, त्यांना १३ हजार ३७६ इतकी एकूण मते मिळालेली आहेत. दिनकर पाटील यांनी प्रभाग क्रमांक ९ मधून निवडणूक लढवली होती.
गौरव गोवर्धने - प्रभाग क्रमांक ३ मध्ये भाजपचे गौरव गोवर्धने हे देखील ९ हजार ०१८ मतांनी निवडून आले असून, त्यांना एकूण १६ हजार ७२९ इतकी मते पडली आहेत.
ऐश्वर्या लाड - प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपच्या ऐश्वर्या लाड या ८ हजार ९१० मतांनी विजयी झाल्या असून, १४ हजार ७९९ एवढी त्यांना एकूण मते मिळालेली आहे.
अवघ्या काही मतांनी पराभूत झालेले उमेदवार
शीतल भामरे - प्रभाग क्रमांक २८ ब मधून शिंदे सेनेच्या शीतल भामरे यांचा अवघ्या १८० मतांनी पराभव झाला असून, येथून भाजपच्या प्रतिभा पवार यांचा निसटता विजय झाला आहे.
प्रवीण पाटील - प्रभाग क्रमांक ८ ड मधून शिंदे सेनेचे विलास शिंदे २८४ मतांनी विजयी झाले असून, त्यांनी भाजपच्या प्रवीण पाटील यांचा पराभव केला. त्यामुळे याठिकाणी अवघ्या २८४ मतांनी प्रवीण पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला.
सागर देशमुख - प्रभाग क्रमांक ३० ड मधून शिंदे सेनेचे सागर देशमुख यांचा ३२४ मतांनी पराभव झाला असून, त्यांच्याविरुद्ध भाजपचे अजिंक्य साने निवडून आले आहेत.
नितीन खोले - प्रभाग क्रमांक २१ ब मधून भाजपच्या नितीन खोले यांचा शिंदे सेनेच्या रमेश धोंडगे यांनी ३५८ मतांनी पराभव केला आहे
ज्योती कवर - प्रभाग क्रमांक २७ ब मधून भाजपच्या ज्योती कवर यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या किरण राजवाडे यांनी ३४८ मतांनी पराभव केला आहे.