देवेंद्र फडणवीस सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद अखेर गेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कोकाटे यांचा राजीनामा त्यांच्या पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्विकारला आहे. त्यांनी हा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अटकेबाबतच्या माहितीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. कोकाटे यांच्यावर आज मुंबईतील रुग्णालयात महत्त्वाची 'कोरोनरी अँजिओप्लास्टी' चाचणी केली जाणार आहे. या चाचणीच्या अहवालानंतरच त्यांना डिस्चार्ज द्यायचा की नाही, याचा निर्णय डॉक्टर घेणार आहेत. डॉक्टरांच्या हिरव्या कंदिलाशिवाय कोकाटे यांना ताब्यात घेता येणार नसल्याने नाशिक पोलिसांचे एक पथक रात्रभर रुग्णालयातच तळ ठोकून आहे.
आता माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उच्च रक्तदाबाचा त्रास वाढल्याने सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल असलेल्या कोकाटे यांच्यावर थोड्याच वेळात अँजिओग्राफी केली जाणार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोकाटे यांना नुकतेच अँजिओग्राफीसाठी नेण्यात आले असून, रुग्णालयात सध्या त्यांच्या मुलगी सीमंतिनी कोकाटे आणि पत्नी सीमा कोकाटे उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीकडे राजकीय वर्तुळासह पोलिस प्रशासनाचेही बारकाईने लक्ष लागले आहे.
दरम्यान, वैद्यकीय अहवाल आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मत लक्षात घेता आज माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी होणार आहे. अँजिओग्राफीचा अहवाल आल्यानंतरच त्यांच्या प्रकृतीबाबत पुढील उपचार, डिस्चार्ज किंवा देखरेखीचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे, कोकाटे यांच्याविरोधात नॉन-बेलेबल वॉरंट (NBW) बजावण्याच्या प्रक्रियेबाबतही चर्चा सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, वैद्यकीय परिस्थिती लक्षात घेता NBW वॉरंट थेट रुग्णालयातच दिले जाण्याची शक्यता आहे. नाशिक पोलिसांची टीम लीलावती रुग्णालयात दाखल झाली आहे. आता माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई कधी होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.