बिल्डरच्या घरात ५० जणांच्या टोळक्याने घुसून लुटले २५ लाखांच्या रोकडसह १६ तोळे सोन्याचे दागिने
बिल्डरच्या घरात ५० जणांच्या टोळक्याने घुसून लुटले २५ लाखांच्या रोकडसह १६ तोळे सोन्याचे दागिने
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- बंद घराचे कुलूप तोडून घरामध्ये बळजबरीने प्रवेश करून दोन महिलांसह सुमारे ४०-५० जणांनी घरातील कपाटातील २५ लाख रुपये रोख व १६ तोळे सोन्याचे दागिने असा ऐवज जबरीने लुटून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सीमा विलास कटारे (रा. स्पेस ओरियन अपार्टमेंट, साने गुरुजीनगर, नाशिकरोड) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की कटारे या बिल्डर व डेव्हलपर्सचा व्यवसाय करतात. त्या दोन मुलांसह राहतात. दि. १९ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला व तिचा मुलगा हे दोघे घरी होते.

त्यावेळी दरवाजा ठोठावला असता फिर्यादीशी परिचित असलेली कविता पवार (फुलेनगर, नाशिक) व तिच्यासोबत आठ महिला व पाच पुरुष असे बळजबरीने घरात घुसले. त्याचा जाब विचारला असता आरोपींनी तिला उलट उत्तर दिले. फिर्यादीच्या मुलाने गणेश गिते नामक व्यक्तीला फोन लावण्याचा प्रयत्न केला असता अन्य आरोपी स्नेहल भालेराव हिने "तू कोणालाही फोन लाव. तुमच्या सर्वांची सुपारी आम्हाला दिली आहे,” असा दम दिला व मुलाच्या हातातील मोबाईल बळजबरीने हिसकावून त्यात केलेले शूटिंग डिलिट केले. "जर तू नाटक केलेस, तर तुझ्यावर विनयभंगाची केस करीन,” असा दम देत आरोपी महिलेने फिर्यादीच्या मुलाला मारहाण केली, तसेच फिर्यादीस जातिवाचक शिवीगाळ केली.

त्यानंतर आरोपी महिलांनी फिर्यादीला घराबाहेर काढत असताना स्नेहल भालेराव हिने "तू कोणाकडेही जा, कोणत्याही पोलीस ठाण्याला जा, तुझी कप्लेन्ट घेतली जाणार नाही,” असे म्हटले. त्यामुळे फिर्यादी घाबरली होती. म्हणून ती पोलीस ठाण्यात आली असता तिच्या तक्रारीची नोंद घेतली गेली नसल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर फिर्यादी महिला घरी गेली असता तिच्या दरवाजाला दुसरे कुलूप लावल्याचे व दरवाजाला सीसीटीव्ही कॅमेरा लावल्याचे दिसून आले व घरातील सामान सर्व आरोपींनी बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये आणून ठेवल्याचे दिसले.

थोड्या वेळाने आरोपी कविता पवार हिने फिर्यादीला फोन करून "घराला लावलेले कुलूप तोडून घरात गेली, तर तुझ्यासह मुलावर गुन्हा दाखल करू,” असा दम दिला. त्यानंतर दि. २३ ऑगस्ट रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांना भेटून घडलेला प्रकार सांगितला. "तुमचे घर आहे, ते जाऊ शकत नाही,” असे त्यांनी सांगितले. त्यानंतर दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला दोन पत्रकारांना घेऊन घरी गेली. त्यांना घडलेला प्रकार सांगून घराचे कुलूप तोडल्यापासून सर्व घराची पाहणी केली.

त्यावेळी फिर्यादीच्या मास्टर बेडरूममध्ये असलेले कपाट उघडून त्यात फिर्यादीने व्यवसायाकरिता ठेवलेली २५ लाख रुपयांची रोकड, १५ ते १६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व फिर्यादीच्या मुलाचे दोन सॅमसंग कंपनीचे मोबाईल फोन असा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याचे दिसून आले, तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त करून त्याची तोडफोड केल्याचे दिसून आले. त्यानंतर फिर्यादी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर बिल्डिंगच्या सिक्युरिटी केबिनजवळ गेल्या असता तेथे फिर्यादी महिलेला बिल्डिंगच्या खाली आरोपी रऊफ शेख, कविता पवार व स्नेहल भालेराव यांच्यासोबत ३० ते ३५ महिला व १५ ते २० पुरुष असे तेथे दिसून आले.

या सर्वांनी फिर्यादीला घरातील राहिलेले सामान काढून घेण्याबाबत दम दिला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सीमा कटारे यांच्या फिर्यादीनुसार आरोपी कविता पवार, स्नेहल भालेराव, रऊफ शेख, तसेच ३० ते ३५ महिला व १५ ते २० पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group