नाशिक (भ्रमर प्रतिनिधी):- ठाकरे गट पाठोपाठ नाशिक मध्ये मनसेला देखील भाजपने धक्का दिला आहे. राज ठाकरे यांच्या मनसेला जय महाराष्ट्र करत मनसेचे तीन बडे नेते भाजपात आज प्रवेश करणार आहेत.
मनसेचे प्रदेश नेते, माजी नगरसेवक दिनकर पाटील, लता पाटील आणि माजी नगरसेवक रवींद्र देवरे हे तिघेही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.
दिनकर पाटील हे काही काळ काँग्रेस व भाजपामध्ये होतेच, त्यानंतर त्यांनी मनसेमध्ये प्रवेश करून विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मते मिळवणारे मनसेचे उमेदवार असा नावलौकिक मिळवला होता, तर त्यांच्या पत्नी लता पाटील यांनीही सातपूरमधून नगरसेवकपद भूषविले आहे. पाटील गटातील सहकारी असलेले माजी नगरसेवक रवींद्र देवरे हे देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
आज शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे, अॅड. यतीन वाघ आणि सहकारी भाजपात प्रवेश करत आहेत. या पाठोपाठ दिनकर पाटील आणि सहकारी भाजपात प्रवेश करत असल्याने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये भाजपाची ताकद वाढणार आहे.