महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये घडामोडींना वेग आला आहे. नाशिकमध्ये काँग्रेसला खिंडार पडले असून बड्या नेत्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी काल (मंगळवारी) पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्याकडे सुपूर्द करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. यानंतर आज दिवे यांनी मुंबई गाठत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि माजी नगरसेवक राहुल दिवे, माजी नगरसेविका आशा तडवी, पूजा नवले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अनिल जोंधळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मंत्री दादा भुसे, महानगरप्रमुख बंटी तिदमे, उपनेते अजय बोरस्ते, माजी नगरसेवक सुर्यकांत लवटे उपस्थित होते.