
निफाड ( वार्ताहर ) निफाड येथील जळगाव फाटा परिसरामध्ये 27 वर्षीय तरुणावर पूर्व वैमनस्यातून गोळीबार झाल्याची गंभीर घटना घडली आहे निफाड सारख्या ग्रामीण भागात अशा प्रकारे गोळीबार होण्याची घटना प्रथमच घडल्यामुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण पसरले आहे.
निफाड पोलिसांकडून याबाबत देण्यात आलेल्या अधिक माहितीनुसार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजेचे सुमारास सुंदरपुर तालुका निफाड येथे राहणाऱ्या सिद्धार्थ मनोहर साळवे या 27 वर्षीय मजुराला जळगाव फाटा परिसरात संशयित आरोपी मयूर ढगे रा. बेघर वस्ती, निफाड, विजय शिंदे रा. मटन मार्केट समोर निफाड, विशाल केंदळे रा. स्वामी समर्थ नगर, निफाड आणि पृथ्वीराज जाधव रा. काथरगाव ता. निफाड या चार आरोपींच्या टोळक्याने मागील भांडणाचा वाद उकरून काढीत शिवीगाळ आणि मारहाण सुरू केली.
दरम्यान संशयीत आरोपी पृथ्वीराज जाधव याने आपल्या जाकिटातील गावठी पिस्तुलातून साळवे याच्यावर अचानक गोळ्यांच्या तीन फेरी झाडल्या . या गोळीबारात साळवे यांच्या कमरेलगत बरगडीला व खांदा तसेच पाठीला दुखापत झाली.
याप्रकरणी गोळीबारातील जखमी तरुण सिद्धार्थ साळवे यांच्या फिर्यादीनुसार निफाड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र अधिनियम कायद्यानुसार संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव आणि सहकारी अधिक तपास करीत आहेत.