नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- स्टेशनरी छपाईच्या बिलांचे पैसे स्वत:च्या खात्यात घेऊन टेरीटरी मॅनेजरने कंपनीची 38 लाखांची फसवणूक केल्याची घटना पंचवटी परिसरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की आरोपी नरेंद्र चांदकुमार पहिलजानी (रा. 102, कृष्णा पार्क, हिरावाडी, पंचवटी) हा एका कंपनीत टेरीटरी मॅनेजर म्हणून कामाला आहे. कंपनीच्या पंचवटी परिसरातील ड्रीम कॅसल बिल्डिंगच्या मागे असलेल्या ब्रँचमध्ये आरोपी पहिलजानीने बनावट कागदपत्रे, ईमेल आयडी व शाळेचे लेटरहेड तयार केले. छपाई केलेल्या स्टेशनरीच्या बिलांची रक्कम जून 2025 पासून आजपर्यंत तो स्वत:च्या खात्यात जमा करीत होता.
आजपर्यंत त्याने विविध ग्राहकांकडून 37 लाख 95 हजार 876 रुपये स्वत:च्या खात्यात जमा केले. ही बाब लक्षात आल्यानंतर प्रदीप तुलसीदास इंगळे यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात नरेंद्र पहिलजानी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.