नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी):- आर्टलरी सेंटरच्या भिंतीलगत असलेल्या सय्यद मळा व चव्हाण मळा परिसरात मागील तीन महिन्यांपासून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात आज पहाटे एक साडेतीन ते चार वर्षांचा बलदंड बिबट्या जेरबंद झाला.

गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचे फिरणे सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पंधरा दिवसांपूर्वी कुरेश सैय्यद यांच्या नातवावर बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला होता. तर दहा दिवसांपूर्वी परिसरात झाडांची छाटणी व साफसफाईसाठी आलेल्या मजुरांना बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने तेथील दहशत शिगेला पोहोचली होती.
याबाबतची माहिती मिळताच कुरेशा सैय्यद, विक्रम कदम, मुन्ना सैय्यद आणि सागर जाचक यांनी वनविभागाशी संपर्क साधून तातडीची कारवाईची मागणी केली होती. नागरिकांच्या सहकार्यामुळे वनविभागाने तीन महिन्यांपूर्वीच या ठिकाणी पिंजरा लावला होता. अखेर आज पहाटे त्याला यश आले.
या कारवाईत वनाधिकारी अनिल अहिरराव व इतर कर्मचारी तसेच वन्यप्राणी बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बिबट्याला सुरक्षित ताब्यात घेतले. सध्या बिबट्याला वैद्यकीय तपासणीसाठी म्हसरूळ येथील वन्यप्राणी उपचार केंद्रात हलविण्यात येत आहे.
यापूर्वीही गेल्या दहा वर्षांत जय भवानी रोड परिसरात तब्बल चार बिबटे पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. मानवी वस्तीच्या अगदी जवळ वन्य प्राण्यांचे वाढते वावर पाहता परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की रात्री अनावश्यक फिरणे टाळावे, जनावरांना बेवारस न सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वनविभागाच्या तत्परतेमुळे एका मोठ्या अनर्थाचा प्रतिबंध झाला असल्याचे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.