नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- सहलीवरुन परतताना पिंपळगाव बसवंत येथील एका महाविद्यालयाच्या बसचा कराडजवळ भीषण अपघात झाला असून, बस पुलावरुन 20 फूट कोसळल्याने 4 जण गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील लेट बी. पी. ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांची सहल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे गेली होती. एम.एच. 04 जी.पी. 0920 या क्रमांकाच्या खासगी ट्रॅव्हल्समधून 45 विद्यार्थी व शिक्षक सहलीसाठी गेले होते. दरम्यान, परतताना आज सकाळी 6.45 वाजेच्या सुमारास बस वाठार तालुक्यातील कराड ब्रिज वरुन सरळ 20 फुट खाली कोसळली. या दुर्घटनेत 4 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून, सर्व जखमींना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताचे मुख्य कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सातार्याच्या जिल्हाधिकार्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. तसेच जखमी विद्यार्थ्यांवर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली. या अपघातात ऋषिकेश पाचोरकर, प्रज्वल माहेर, सार्थक चव्हाण व पियुष काळे यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती कराडच्या तहसिलदारांनी दिली.
कराड ब्रिजजवळ पुलाचे काम सुरू आहे. त्याचा अंदाज ड्रायव्हरला न आल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या अपघातात बसचे देखील मोठे नुकासन झाले असून,बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे.