एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. खासगी बसच्या अपघातात ८ प्रवाशांचा मृत्यू झालाय. हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्याच्या हरिपुरधार येथे ही अपघाताची घटना घडली आहे. खासगी बस थेट दरीत कोसळून हा भीषण अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस शिमला येथून कुपवीकडे जात होती. हरिपुरधारमध्ये ही बस आली असता नियंत्रण सुटून ती दरीत कोसळली. बसमध्ये पन्नास ते साठ प्रवासी होते. बस अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू करण्यात आले.
सिरमौरचे पोलीस अधीक्षक निश्चिंत सिंह नेगी यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, सिरमौर जिल्ह्याच्या हरिपुरधारजवळ कुपवीहून शिमला येथे जाणारी खासगी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत कोसळली. या अपघातात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या बसमध्ये अनेक प्रवासी होते. पोलीस आणि बचाव पथके जखमींना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत.
हा अपघात शुक्रवारी दुपारच्या सुमारास झाला. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. गंभीर जखमी असलेल्या पाच रुग्णांना उपचारासाठी संगडाह, ददाहू आणि नाहन येथील रुग्णालयांत नेण्यात आले आहे.