ज्या लाडक्या लेकाचा वाढदिवसाचा केक कापून , आनंदाने शुभेच्छा देऊन साजरा केला, त्याच मुलाचा मृतदेह पाहण्याची दुर्दैवी वेळ एका पित्यावर आली. इंदूरच्या बायपासवर शुक्रवारी पहाटे झालेल्या एका भीषण अपघाताने तीन कुटुंबं पूर्णपणे हादरली. आज सकाळी रालामंडलमधील तेजाजी नगर बायपासजवळ कार आणि ट्रकची टक्कर होत भीषण अपघात झाला.
मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री बाला बच्चन यांची लेक प्रेरणा बच्चन आणि काँग्रेस प्रवक्ते आनंद कासलीवाल यांचा मुलगा प्रखर कासलीवाल यांच्यासह आणि मान संधू या तिघांचा अपघातात जागीच मृत्यू झालाय. तर अनुष्का राठी ही तरुणी अपघातामध्ये गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुरुवारी रात्री सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं. निमित्त होतं प्रखर कासलीवाल याचा वाढदिवस. आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ही मित्रमंडळी महू येथील एका फार्म हाऊसवर जमली होती. रात्रभर हास्य-विनोद झाले, केक कापला गेला. कोणालाही कल्पना नव्हती की ही त्यांची एकत्र घालवलेली शेवटची रात्र असेल.
पहाटे सव्वा पाचच्या सुमारास पार्टी संपवून हे सर्वजण घराकडे निघाले आणि तेजाजी नगर बायपासवर काळाने झडप घातली. वेगवान नेक्सॉन कार समोरून जाणाऱ्या एका ट्रकला पाठीमागून इतक्या जोरात धडकली की कारचा पुढचा भाग चक्काचूर झाला. आत बसलेल्या प्रेरणा, प्रखर आणि मान संधू या तिघांना सावरण्याची संधीही मिळाली नाही.
काच आणि लोखंडाच्या तुकड्यांमध्ये ही तरुण स्वप्नं चिरडली गेली. अनुष्का राठी ही तरुणी मृत्यूशी झुंज देत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जेव्हा गाडीचा दरवाजा कटरने कापून त्यांना बाहेर काढलं, तेव्हा दृश्य इतकं भयाण होतं की उपस्थितांच्या काळजाचा थरकाप उडाला.
पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी एमवाय रुग्णालयात पाठवले. तर जखमी झालेल्या तरुणीला उपचारासाठी नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. जखमी तरुणीची प्रकृती गंभीर आहे. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे.
बाला बच्चन हे कमलनाथ सरकारमध्ये गृहमंत्री होते. ते मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे बडे नेते आहेत. इंदूरमधील अपघातावर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, 'काँग्रेसचे आमदार बाला बच्चन यांची कन्या प्रेरणा बच्चन यांच्यासह रस्ते अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. मी सर्वांना श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या आत्म्यांना शांती मिळावी आणि जखमी अनुष्का राठी लवकर बरी व्हावी यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. या दुःखाच्या वेळी माझ्या संवेदना मृतांच्या कुटुंबीयांसोबत आहेत.'